Ganesh Chaturthi 2022: सत्यनारायणाची पूजा असो किंवा गृहप्रवेश अगदी लग्नात सुद्धा शुभकार्यात तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्तव असते. सर्व देवी देवतांच्या पूजेत मानाचं स्थान मिळवणारी तुळस गणरायाच्या पूजेत मात्र नेहमी वर्ज्य केली जाते. पौराणिक कथांमध्ये आढळणाऱ्या दाखल्यांनुसार गणपतीने लंबोदर रूपात असताना तुळशीला शाप दिला होता, ज्यामुळे गणेशाच्या पूजनात तुळशीचं पान कधीच अर्पण केली जात नाही. असं असलं तरी गणेश चतुर्थीचा एक दिवस मात्र याला अपवाद असतो, खरंतर शाप दिल्यांनतर गणरायाला वाईट वाटल्याने त्यानेच तुळशीला तुला केवळ वर्षातून एकदा माझ्या पूजेचा मान मिळेल असे सांगितले होते. मात्र असं काय घडलं की सर्व पूजांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीला बाप्पाने शाप दिला होता, चला तर जाणून घेऊयात ही आख्यायिका…
पौराणिक कथेनुसार, धर्मराजाची कन्या वृंदाने (तुळशीला वृंदा असेही म्हणतात) विष्णूसोबत विवाहाचा हट्ट धरला होता. मात्र तिच्या वडिलांनी तिला हट्ट सोडून एखाद्या मानवाशी लग्न करण्याचा सल्ला दिला. वृंदेने तरीही हट्टाने भगवान विष्णूची उपासना सुरु ठेवली. एक दिवस भागीरथी नदीच्या काठी उपासनेला बसलेली असताना वृंदेचे लक्ष जवळच बसून ध्यानधारणा करणाऱ्या गणेशाकडे गेले. मोहित होऊन वृंदा थेट गणरायांकडे गेली व तिने त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. Ganesh Chaturthi 2022: गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहावी? जाणून घ्या यामागचे कारण
वृंदेच्या हाक मारण्याने गणरायाचे ध्यान भंग झाले व त्यामुळे त्यांना संताप येऊ लागला, अशातच वृंदेने लग्नाची इच्छा सांगताच ते अधिक चिडले व मी ब्रह्मचर्येचा मार्ग स्वीकारल्याचे सांगून त्यांनी तिला तिथून जाण्यास सांगितले. गजाननाने नकार दिल्याने क्रोधीत वृंदेने त्यांनाच शाप दिला की तुमचा विवाह होईल व तुम्ही ब्रह्मचर्य स्वीकारूच शकणार नाही. वृंदेचं बोलणं ऐकून गणरायांनी तिला शाप देत तुझा विवाह राक्षसाशी होईल व तुला माझ्या पूजेत कधीच स्थान मिळणार नाही असे सांगितले.
गणपती सुद्धा साक्षात शिवपुत्र असल्याचे जाणवल्यावर वृंदाला खजील वाटू लागले व तिने गणपतीची क्षमा मागितली. यानंतर गणपतीने तिला वरदान देत तुला माझ्या पूजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही असे सांगितले.
Ganesh Chaturthi 2022: गणपतीच्या आरतीमध्ये नेहमी चुकणारे ‘हे’ शब्द आधीच पाहून घ्या, नंतर फजिती नको
गणपतीच्या शापानुसार, वृंदेचा पुढील जन्म राक्षसाच्या पोटी झाला व एका पराक्रमी राक्षसाशीच तिचा विवाह झाला. त्याच्या मृत्यूनंतर चिंतेत उडी मारून वृंदेने प्राणत्याग केला व तिचे वृक्षरूपात तुळस म्हणून परिवर्तन झाले. वृंदेच्या विष्णुभक्तीने प्रसन्न होऊन तिला वृक्षरूपात विष्णूपत्नी म्हणून मान मिळाला.
(टीप- सदर लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)