Ganpati Decoration Paper Plates Theme: गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता अगदी जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. यंदा १९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र गणरायाचे आगमन कसे थाटामाटात करायचे आणि जिथे गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे ते स्थान कसे सजवायचे, त्याची थीम कशी असणार याबद्दल खूप आधीपासूनच चर्चा सुरु होते. सोशल मीडियावर अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर साधे सोपे आणि सुंदर अशा डेकोरेशन थीमचे व्हिडीओ शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवरील एका चॅनेलवर गणरायाच्या आगमनासाठी केलेल्या एका डेकोरेशन थीमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर तो व्हिडीओ नक्की काय आहे आणि त्यात कशाप्रकारे सजावट करण्यात आली आहे ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन हे मोठ्या उत्साहात केले जाते. तसेच काही जणांकडे दीड, पाच, सात आणि अकरा दिवस गणपतीची स्थापना केली जाते. यावेळी काही जण पर्यावरपूरक तर काही अनोख्या अशा प्रकारचे डेकोरेशन करत असतात. इन्स्टाग्रामच्या एका अकाउंटवरून युजरने घरच्या घरी तयार केलेल्या डेकोरेशनचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात पेपर प्लेट्सपासून सजावट करण्यात आली आहे.

हेही वाचा : गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील कथा; जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, इतिहास व महत्त्व

पेपर प्लेटचा वापर करून खूपच सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले आहे. पेपर प्लेटपासून सजावट करण्यासाठी या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पेपर प्लेट्स, विविध रंग, विविध रंगाचे पेपर्स, गोल्डन पेपर आणि थ्रेड व मास्किंग टेप या साहित्याचा वापर केलेला दिसत आहे. सर्वात पहिल्यांदा खूप साऱ्या पेपर प्लेट्स घेतल्या असून त्या केशरी रंगाच्या रंगाने रंगवण्यात आल्या आहेत. प्लेट्स रंगवून झाल्या की त्या फोल्ड करून कापलेल्या दिसत आहे. म्हणजेच एका प्लेटचे दोन भाग केलेले आहेत. नंतर त्या प्लेटच्या बॉर्डरला लाल रंग देण्यात आला आहे. त्यानंतर त्यावर पेपर प्लेट्स दिव्याच्या आकारामध्ये कापून त्या अर्ध्या कापलेल्या प्लेट्सवर चिकटवलेल्या दिसत आहेत. म्हणजेच ते पूर्ण झाल्यानंतर त्याची पणती तयार झालेली दिसत आहे. त्यानंतर पणतीवर गोल्ड पेपर कापून चिकटवला आहे. त्यामुळे ती पणती अगदी खरीखुरी दिसत आहे.

पेपर प्लेट्सपासून तयार झालेल्या या सर्व पणत्या आता एका लेसवर चिकटवल्या आहेत. त्यानंतर त्या भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी लहान लहान गोलाकार अशा चकत्या दोन पणत्यांच्यामध्ये टेपच्या मदतीने चिकटवण्यात आल्या आहेत. हे सर्व तयार झाल्यानंतर या लेस भिंतीवर टेपच्या साहाय्याने मदतीने लावण्यात आले आहे. थोडक्यात काय तर पेपर प्लेट्स आणि इतर सोप्या साहित्यांच्या मदतीने सुंदर अशी सजावट गणपती बाप्पासाठी करता येऊ शकते हे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्य देखील सहज उपलब्ध होत असल्याने तुम्ही या प्रकारची सजावट तुम्ही गणपती बाप्पासाठी करू शकता.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @colours Creativity space या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून या डेकोरेशन थीमचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival 2023 using paper plates for making ganpati background decoration theme tmb 01