तेव्हा आणि आता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिन्हीसांजेपासून वर्गणी गोळा करून रात्री मंडपामध्ये देखावा साकारण्यासाठी झटणारे कार्यकर्ते हे दृश्य आता अपवादानेच पाहावयास मिळत असून, गणेशोत्सवाची वाटचाल ही ‘इव्हेंट’कडे झाली आहे. आपली संकल्पना मूर्त स्वरूपात साकारण्यासाठी राबणारे कार्यकर्ते ते देखाव्याचे कंत्राट देऊन चित्रपटामध्ये शोभेल असा आयता भव्यदिव्य देखावा अशा अवस्थेला उत्सव आता येऊन ठेपला आहे.

दहीहंडी उत्सव ही गणेशोत्सवाची रंगीत तालीम समजली जाते. दहीहंडीपासूनच कार्यकर्त्यांची गणेशोत्सवाची लगबग सुरू होत असे. वर्गणी जमा करण्यासाठी पावतीपुस्तके आणि मंडळाच्या कार्यअहवालाची छपाई ही कामे एका बाजूला, तर मंडप उभारणी करणाऱ्यांना मदत करण्यापासून देखाव्याची संकल्प रेखाचित्रे चितारण्यापर्यंत कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेत असत. कार्यकर्त्यांच्या दोन फळय़ा स्वतंत्रपणे कार्यरत असल्या तरी एकमेकांना पूरक असे काम होत असे. एक तुकडी वर्गणी गोळा करण्याच्या मोहिमेवर असायची. तर, दुसरी फळी मंडपामध्ये कामाला तैनात केली जायची. एकमेकांना पूरक काम करीत देखावा साकारण्यासाठी राबणारे हात आणि या कार्यकर्त्यांना वेळच्या वेळी जेवण मिळेल याची दक्षता घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय असे चित्र दिसायचे. पौराणिक-ऐतिहासिक देखावे आणि थर्माकोलची मंदिरे हे एकेकाळच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ होते. डी. एस. खटावकर, जीवन रणधीर आणि विवेक खटावकर असे कलाकार देखाव्याचे काम साकारत असताना कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या दिमतीला राहून रात्र जागवून काढत असे. आता काळाच्या ओघात हे लुप्त होताना दिसून येत आहे.

जागतिकीकरणाच्या प्रवाहानंतर गणेशोत्सवही बदलला. गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी हे आपले ग्राहक आहेत या भूमिकेतून उद्योगांनी आधी बॉक्स कमानींच्या माध्यमातून जाहिरात केली. गणेश मंडळांना हा उत्पन्नाचा नवा स्रोत झाला. काही मंडळांनी तर संपूर्ण देखाव्यासाठीच प्रायोजकत्व घेण्यास सुरुवात केली. राजकीय नेते मतपेढीच्या दृष्टिकोनातून बांधून ठेवण्यासाठी गणेश मंडळांना जवळ करून लागले. कुणी गणपतीला सोन्या-चांदीचे दागिने दिले, तर कोणी रोख रकमेच्या स्वरूपात देणगी दिली. त्यामुळे गणेश मंडळांची आर्थिक स्थिती सुधारली आणि कार्यकर्तेदेखील निर्धास्त झाले. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट साकारणारे कलादिग्दर्शक गणेशोत्सवामध्ये सहभाग घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना कंत्राट दिले की उत्सव सुरू होण्यापूर्वी देखावा साकारला जातो याची शाश्वती झाली. एकेकाळी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्ता घडला जात होता. मात्र, आता या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट’ केला आहे. आता कामाच्या व्यापामुळे कार्यकर्ते व्यग्र झाले असून आयतेपणाची माणसाची प्रवृत्ती उत्सवामध्येही दिसू लागली.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Event management in ganesh festival
Show comments