अभिनेत्री श्रेया बुगडे
चैतन्य, आनंद आणि उत्साह घेऊन येणारा गणेशोत्सव. या उत्सवाशी निगडीत प्रत्येकाच्याच विविध आठवणी असतात. लहानपणीचा बाप्पा, त्यावेळी साजरा होणारा गणेशोत्सव आणि त्यानंतर महिलांसाठी लग्नानंतर साजरा होणारा गणेशोत्सव हाही फार वेगळा असतो.अभिनेत्री श्रेया बुगडेसाठीही लग्नानंतरचा हा गणेशोत्सव थोडासा खास आहे.
गणपती बाप्पा माझा सर्वात आवडता देव आहे. लहानपणा पासूनच गणपतीला मी माझा भाऊ मानते. मी आणि माझी बहिण आम्ही दरवर्षी गणेशाला रक्षाबंधनला त्याला राखीसुद्धा बांधतो. माझी आई तर चक्क त्याला तिचा मुलगाच मानते. माझ्या हातावर त्याच्याच नावाचा टॅटूही कोरला आहे. यावरुन माझ्या मनातलं बाप्पाचं स्थान कळून येतं. माझ्या हातावरील टॅटूमुळे तो नेहमीच माझ्या सोबत असतो असं सारखं मला वाटतं.
माझ्या माहेरी गणपती आणत नाहीत. पण तरीही या वर्षीचा बाप्पा माझ्यासाठी खूपच खास आहे. यावर्षी माझ्या सासरी पुण्याला बाप्पाचे आगमन झाले आहे. दीड दिवसांच्या या काळात गणेशोत्सव नक्की काय असतो हे मी नव्याने अनुभवणार आहे. कामानिमित्त आम्ही नेहमीच परिवरापासून लांब असतो. कधी भेटायचे झाले तरी ती धावती भेट असते. परत मुंबईत येऊन आपआपल्या कामांमध्ये सारेच व्यग्र होऊन जातो.
पण गणपतीमध्ये मात्र आम्ही वेळात वेळ काढून सर्व एकमेकांना भेटतो. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाचे आवडते मोदक करून एकत्र जेवण करतो. कुटुंबियांसोबत घालावलेला हा काळ फारच अविस्मरणीय असतो. बाप्पा त्याच्यासोबत येताना सुख समृद्धी घेऊन आपल्या घरामध्ये येतो. तो आपल्यासोबत सतत आहे या एका विचारानेच आपल्यावर आलेले कठीण प्रसंगही आपण सहज पार करु शकतो अशी भावना नेहमीच मनात असते. कोणत्याही संकटांपासून लढण्याची ताकदसुद्धा बाप्पाचं आपल्याला देतो.