सिनेमा, मालिका, नाटक या माध्यमांमध्ये काम करताना कलाकारांचे काही सण अनेकदा सेटवरच साजरे होतात. पण, संपूर्ण वर्षात असा एक सण असतो जेव्हा कलाकार मंडळी आवर्जून घरी राहणं पसंत करतात. आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी गणपतीची सजावट, आरास, खाद्यपदार्थ या सगळ्याची तयारी ते वेळात वेळ काढून करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गायिका नेहा राजपालचंही काहीसं तसंच आहे माहेरी मामाकडे येणारा गणपती असो की आता स्वतःच्या घरचा गणपती हा गणेशोत्सव हा तिचा सर्वात आवडीचा उत्सव आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी तरी माहेरच्या गणपतीची आठवण येतेच. माहेरच्या गणपतीच्या काही आठवणी तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे शेअर केल्या आहेत.

या सणाएवढी मी कोणत्याच सणांची उत्सुकतेने वाट पाहत नाही. या धकाधकीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला भेटणं शक्य असतंच असं नाही. पण या सणात आमच्याकडे सगळे आवर्जून येतात. असे अनेकजण आहेत जे गणपती ते गणपती असेच भेटतात. पण ती भेटही खूप काही आनंद देणारी असते. माझ्या आईच्या घरी मामा- मामीकडे गणपती यायचा. या सणात पूर्ण कुडाळकर कुटुंब एकत्र यायचं.

मी त्या दिवसांमध्ये मालवणी भाषा एवढी ऐकायचे की ती वर्षभर पुरायची. आईकडचे सगळेच नातेवाईक एकमेकांशी बोलताना मालवणीमध्येच बोलतात. ती भाषा आजही ऐकली की मला माझे माहेरचे ते दिवस आठवतात. लहान असताना नैवेद्याला दिलेलं पान नेहमी मलाच हवं असायचं. ते पान मी दुसऱ्या कोणालाच घेऊ द्यायची नाही. शिवाय त्या नैवेद्याच्या पानासोबत अधिकचे मोदकही मला हवे असायचे. माझी मामी माझा हा हट्ट हमखास पुरवायची. ती नैवेद्याचं पान नेहमी माझ्यासाठीच ठेवायची. पण आता सासरी घरीच गणपती असल्यामुळे इच्छा असूनही तिथे जाता येत नाही.

यंदा आमच्याकडे १२ दिवस बाप्पा असणार आहे. यावर्षी आम्ही शाडूच्या मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की मूर्तीची उंची वाढती असावी पण कमी करु नये. पण आम्ही यावर्षी मूर्तीची उंची कमी केली आहे. शाडूच्या मातीची मूर्ती जरी असली तरी विसर्जन करताना ती मातीही शेवटी त्या तलावातच जाणार आणि तलाव दुषित होणार. शिवाय जेवढी मोठी मुर्ती तेवढी सजावटही मोठी करावी लागते. त्यामुळे अनेकदा प्लॅस्टिकचा वापर करावा लागतो.

या सगळ्या गोष्टींवर आमच्या परिने नियंत्रण यावं म्हणून आम्ही या वर्षापासून गणपतीच्या मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला. या सजावटीमध्ये आम्ही फुलं आणि बांबू या नैसर्गिक गोष्टींचाच वापर केला आहे. आम्ही ठरवून यावर्षी १२ दिवसांचा गणपती ठेवला. याच मुख्य कारण म्हणजे आपण एरव्ही स्वतःला खूप राबवत असतो पण या १२ दिवसांमध्ये ठरवून सुट्टी घ्यायची आणि स्वतःला पुढच्या वर्षभरासाठी चार्ज करायचं.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2017 bollywood and marathi celebrities ganesh celebration and decoration neha rajpal interview