गेल्या वर्षी उत्तराखंड दुर्घटना, माळीण दुर्घटना, पर्यावरणाचा वाढता ऱ्हास अशा घटनांवर आधारित देखावे गणेशोत्सवाच्या माध्यमातून जागोजागी पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे यंदा सैनिकांची सुरक्षा, सर्जिकल स्ट्राइक, सैनिकांवरील अत्याचार आदी विषयांमधून भारतीय लष्कर काही न काही कारणास्तव चर्चेत राहिले. भारतीय लष्कराविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेला आदर लक्षात घेता, यंदा ठाण्यातील बहुतेक मंडळांनी सैनिकांवर आधारित देखावे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेहमीच समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे प्रतिबिंब सण-उत्सवांवर पडत असते. गेल्या वर्षभरामध्ये देशात अनेक महत्त्वाच्या चांगल्या वाईट घटना घडल्या. त्यापैकी काही सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर करून राहिल्या. भारतीय सैन्य दलाने केलेले सर्जिकल स्ट्राइक हे संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असली तरी, त्याचबरोबर लष्करातील सैनिकांचे होणारे हाल, देशासाठी लढताना आलेले वीरमरण आदी बाबींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सैनिकांविषयी आस्था असते. भारतीय लष्कराच्या अशा अनेक बऱ्या-वाईट गोष्टींवर विविध माध्यमातून दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न यंदा ठाण्यातील काही प्रमुख मंडळे करणार आहेत. गणेशोत्सवामध्ये देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन नेहमीच होत असते. यंदा मात्र समाजप्रबोधनाबरोबरच सत्य घटनांवर आधारित देखावे उभारण्याचा निर्णय ठाण्यातील मंडळांनी घेतला आहे.
गांधीनगर येथील शिव समर्थ मित्र मंडळ यंदा ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विषयावर देखावा तयार करणार आहेत. तसेच ओम शक्ती विनायक मंडळ ‘आर्मी दी रिअर हिरो’या विषयावर, तर लोकमान्यनगर येथील डवले नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘जरा याद करो कुर्बानी’ या विविध विषयांवर चलचित्र, देखावे आणि प्रदर्शने मांडणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
सामाजिक विषय
‘भारतीय लष्कर’ या विषयाव्यतिरिक्त यंदा सेल्फीमुळे होणारे अपघात, गाईंचे संरक्षण, शेतकरी आत्महत्या असे अनेक विषय विविध माध्यमांतून चर्चिले गेले. त्यापैकी गोमातेचे महत्त्व, गोमातेचे रक्षण करू, कर्जमुक्त शेतकरी, समाज माध्यमांचे चक्रव्यूह, सेल्फी एक घात छंद अशा विविध विषयांवर भाष्य करणारी चलचित्रे, देखावे यंदा गणेशोत्सव मंडपामध्ये पाहायला मिळणार आहेत.
सैनिक वर्षांचे बाराही महिने ऊन-पावसाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. आपण केवळ सीमेपलीकडून चर्चा करतो. हल्लीच्या तरुणांचा देशसेवेकडे फारसा कल दिसून येत नाही. त्यांच्यापर्यंत भारतीय सैन्यांची व्यथा पोहोचावी आणि त्यांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण व्हावे, यासाठी यंदा आमच्या मंडळातर्फे ‘जरा याद करो कुर्बानी’ या विषयावरील चलचित्र तयार करण्यात येणार आहे.
– विवेक घारगे, अध्यक्ष डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे