सिन्नरच्या संजय क्षत्रिय यांचा ३३ हजार मूर्ती निर्मितीचा विक्रम

गणेशाची विविध रूपे सर्वत्र प्रगट होत असताना अतिशय सूक्ष्म आकारात थोडे थोडके नव्हे, तर तब्बल ३३ हजार मूर्ती साकारण्याचा अनोखा विक्रम सिन्नरच्या संजय क्षत्रिय यांनी केला आहे. तब्बल २० वर्षांची ही तपश्चर्या त्यामुळे फळाला आली आहे. विशेष म्हणजे, शाडू मातीच्या ११ हजार छोटय़ा मूर्तीच्या आधारे त्यांनी यंदा १८ फूट बाय १२ फूट अशा आकारात महागणेश साकारला आहे. सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी जशी गर्दी असते, तशीच गर्दी क्षत्रिय यांनी निर्मिलेला महागणेश पाहण्यासाठी होत आहे.

रंगकाम हे खरे तर संजय क्षत्रिय यांचे रोजीरोटीचे साधन. गणेशावरील भक्ती त्यांना मूर्ती निर्मितीकडे घेऊन गेली. वास्तविक, गणरायाची अर्धा ते एक फूट किंवा त्याहून अधिक उंचीची मूर्ती साकारणे तसे अवघड नसते. मूर्तिकार त्या सहजतेने तयार करतात. खरी कसोटी लागते ती सूक्ष्म आकारातील गणेश साकारताना. दोन दशकापासून ते हा छंद जोपासत आहेत.

अगदी सुपारीच्या आकारापासून म्हणजे पाव इंचापासून ते अधिकतम तीन इंच आकारात त्यांनी गणेशाची विविध रूपे साकारली. त्यात नाचणारे गणेश, तबला, ढोल, डमरू व विणा वाजविणारे गणेश, सुपारीवर ११ गणेशमूर्ती अशी अनोख्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यांचा सूक्ष्म गणेशाचा संग्रह सर्वाना थक्क करतो.

सूक्ष्म गणपतीची दहीहंडी, ५१ वेगवेगळे फेटे तयार परिधान केलेल्या मूर्ती, बासरी वादन आणि पुस्तक वाचन करणारे गणेश अशी अनेक रूपे त्यांनी अतिशय लहान आकारात निर्मिली आहेत. शाडू मातीतील मूर्तीच्या माध्यमातून साकारलेला महागणेश पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत असताना त्यांच्या सूक्ष्म गणेशमूर्तीच्या सिन्नरमधील लाल चौकात आयोजित प्रदर्शनात प्रतिसाद मिळत आहे.

महागणेश साकारण्यासाठी पत्नी वंदना व मुलगी पूजा व अक्षदा यांचे सहकार्य मिळाल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. घर फारसे मोठे नसताना हा महागणेश साकारणे शक्य झाले. लहान आकारातील गणेशमूर्ती तयार करणे हा क्षत्रिय यांचा छंद. रंगकामाद्वारे ते संसाराचा गाडा ओढून आपली कला जोपासत आहे. त्यातून आज ३३ हजार गणेशमूर्तीची निर्मिती झाली आहे.

प्रसिद्ध मंदिराच्या प्रतिकृतीचीही निर्मिती

गणेशमूर्तीबरोबर एक लाख आगपेटीच्या काडय़ांपासून दादरचे सिद्धिविनायक मंदिर, २५ किलो कापसापासून अक्षरधाम मंदिर (दिल्ली), साबुदाण्यापासून ताजमहाल, दोन हजार खडूंचे पाच हजार तुकडे कोरून अयोध्या येथील नियोजित राम मंदिर तसेच अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. सुवर्ण मंदिराच्या प्रतिकृतीत साडेतीन लाख मण्यांचा वापर करण्यात आला. ही कला सर्वदूर पोहचावी यासाठी निरपेक्ष भावनेने ते काम करतात. मूर्तीचा हा संग्रह त्यांना पुणे, मुंबईसह देशातील कानाकोपऱ्यात प्रदर्शनाद्वारे पोहोचवायचा आहे. तथापि, आर्थिक स्थितीअभावी तो केवळ नाशिक व त्यातही सिन्नरपुरताच मर्यादित राहिल्याचे वास्तव आहे.

 

 

Story img Loader