उत्साह, ऊर्जा, सकारात्मकता या सर्व गोष्टी घेऊन येणारा गणेशोत्सव. बाप्पाच्या आगमनाने वातावरण प्रसन्न होऊन जातं. गणेशोत्सवात अनेकजण गावी जातात आणि प्रत्येकाच्या गावी या उत्सवाचे विविध रंग पाहायला मिळतात. ‘होणार सून मी..’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता विनोद गायकरनेही गणेशोत्सवातील त्याचे अनुभव सांगितले.
‘माझ्या घरी सात दिवसांकरिता गणपती बाप्पाचे आगमन होते. या सात दिवसांत घरातील वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. गावी गणेशोत्सवाची वेगळीच मजा असल्याने आगमनाच्या दिवशीच मी गावी जातो. माझ्या गावी शंभरपैकी ५५ घरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होते.’
Ganesh Utsav 2017 : आमचा लाडोबा गणपती- उषा नाडकर्णी
विनोदच्या गावी बाप्पाच्या आगमनाची एक वेगळीच पद्धत आहे. याविषयी तो पुढे सांगतो की, ‘गणरायाचं स्वागत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार करत असतो. माझ्या गावीही बाप्पाचं आगमन अनोख्या पद्धतीने होतं. माझ्या गावी एक परंपरा आहे. गावातील प्रत्येक घरातल्या गणपतीचं स्वागत नाचून केलं जातं. गावातील प्रत्येक गणपतीपुढे थोडा वेळ तरी नाचावं लागतं. बाप्पाच्या आगमनाने आम्हाला खूप आनंद झाला, हे यातून दर्शविलं जातं. सकाळी ९ वाजल्यापासून याची सुरुवात होते आणि सर्व घरांतील बाप्पाचं स्वागत करेपर्यंत दुसरा दिवस उजाडतो. मुंबईतल्या घरीही बाप्पा विराजमान असल्याने मी दुसऱ्या दिवशी मुंबईला परततो. इथेही सात दिवस जागरण, भजन, पूजा असा कार्यक्रम असतो. लहानपणी माझी आई गणेशोत्सवात भजनं आणि गाणी म्हणायची. ती भजनं, गाणी माझ्या अजूनही लक्षात आहेत.’