अभिनेत्री प्रिया बापट

माझ्या माहेरी गणपती आणत नाहीत. पण आमच्या गावी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. मला लहानपणापासूनच आमच्या घरी गणपती आणावा असे वाटायचे. मी दादरच्या चाळीत वाढलेय. आमच्या घरी गणपती नसला तरी चाळीत गणपती यायचा. हा गणपती आमच्या जास्त जिव्हाळ्याचा होता. विशेष म्हणजे माझा जन्म अनंत चतुर्दशीचा असल्यामुळे गणपतीशी माझे एक वेगळ नाते आहे.

आमच्याकडे मोठी आरती नावाचा प्रकार असतो. जवळपास दीड तास अगदी तालासुरात मोठी आरती केली जाते. या आरतीला बिल्डिंगमधले सर्व लोक जमतात. माझी अभिनयाची सुरुवातसुद्धा येथूनच झाली. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आम्ही ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ नाटक सादर केलेल. तेव्हा मी अगदी पाच वर्षांची होते आणि म्हातारीची भूमिका साकारलेली. माझं हे काम पाहून आमच्या शेजारच्या काकांनी मला एक दुधाचा कप आणून दिला होता. ते माझे पहिले बक्षिस होते आणि सगळेजण मला ‘तुला कप मिळाला, कप मिळाला’ असे म्हणू लागले. पण, त्याचवेळी काकांनी मी पुढे जाऊन अभिनय क्षेत्रातच काहीतरी करणार असे म्हटले होते. योगायोगाने त्यांचे शब्द खरे ठरले आणि आज मी एक अभिनेत्री आहे.

माहेरचा गणपती : ‘आमच्याकडे पुजेचा मान ‘त्या’ महिलेला देतात’

मी मोठी झाल्यापासून ते अगदी माझे लग्न होईपर्यंत बिल्डिंगमधल्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी माझ्यावर होती. घराबरोबरच बाहेरच्या वातावरणातही माझ्यावर बरेचसे संस्कार झाले असे मला वाटते. हल्लीच गणेशोत्सवाचे स्वरुप बघितले की मला खूप कंटाळा येतो. कारण, या सणातील सात्विकता आता निघून गेलीये असे मला वाटते. आस्तिक, नास्तिक असलेली सर्व मित्रमंडळी आमच्या घरी गणपतीला येतात. त्यानिमित्ताने एकत्र भेटणं होत हे त्यामागचे कारण असते. मूर्तीची सजावट करताना जे सकारात्मक वातावरण तयार होते ते मला आवडते.

माहेरचा गणपती : उत्सवाच्या अतिरेकापेक्षा मनोभावे पूजा महत्त्वाची- अनुराधा राजाध्यक्ष

एका मूर्तीची पूजा करा आणि त्यात देव शोधा अशा मतांची मी अजिबात नाहीये. पण, मला गणपती खूप आवडतो. त्याची मूर्ती, शरीर, डोळे, गोंडसपणा, बुद्धी हे सगळं मला प्रचंड आवडते.

शब्दांकन- चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

Story img Loader