अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्याकडे गौरी-गणपती असतात. विशेष म्हणजे बाप्पाचं विसर्जन केले जात नाही. निसर्गाला अनुरुप अशी मातीच्या गणपतीची मूर्ती तयार केली जाते. पुण्यात पर्वतीला काही विद्यार्थी मिळून गणपतीच्या मूर्ती तयार करतात, त्यांच्याकडून आम्ही मूर्ती घेतो. पण दरवर्षी मूर्ती घेतली जात नाही. वर्षानुवर्षे एकच मूर्ती आम्ही पूजेत वापरतो. गेल्याच वर्षी आम्ही आठ वर्षांपूर्वीची मूर्ती विसर्जित केली. देव हा चराचरांत वसलेला असतो. तो निसर्गात, माणसांत आणि प्रत्येक गोष्टीत आहे. त्यामुळे त्याचे विसर्जन करणे आम्हाला पटत नाही. गणेशोत्सवानंतर आम्ही ती मूर्ती व्यवस्थित कपड्यात बांधून देवघरात ठेवतो आणि नंतर पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला पुन्हा बाप्पाला सजवून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. इतरवेळी एकमेकांशी न बोलणारेही गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीत आरतीला येतात. भेटीगाठी होतात. विशेष म्हणजे यावेळी सर्वजण नामस्मरणाला एकत्र बसतात.

वाचा : लालबागच्या राजाच्या चरणी शंकर महादेवन नतमस्तक

माझ्या आईची एक गोष्ट मला खूप आवडते. आपल्याकडे विधवा महिलेला ओटी भरण्याचा किंवा पूजा करण्याचा मान शक्यतो दिला जात नाही. नवऱ्याचे निधन झाल्यावर तिच्याकडून सौभाग्याचे सर्व अधिकार काढून घेण्यात येतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे या महिलांना सन्मान देण्यासाठी माहेरी दरवर्षी एका विधवा महिलेला गणपतीची पूजा करण्याचा मान दिला जातो. ही पूजा अगदी साधी असते. ती मनापासून प्रार्थना आणि आरती करते. वामनराव पै यांचे तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर आमच्याकडे हे सर्व बदल करण्यात आले. विवाहित महिलांची ओटी भरण्यात येते तेव्हा विधवा मात्र अशाच बघत बसतात. या परिस्थितीत बदल होण्याची गरज आहे. पण, तत्त्वज्ञान स्वीकारल्यामुळे माझ्या आई-बाबांकडून हे खूप छान कार्य घडलंय.

वाचा : ‘उत्सवाच्या अतिरेकापेक्षा मनोभावे पूजा महत्त्वाची’

गेल्यावर्षी बाप्पाचे विसर्जन करण्यामागेही एक कारण होते. माझी आई प्राणीमित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर मांजर किंवा कुत्रे दिसले की ती लगेच त्यांना घरी येऊन येते आणि डॉक्टरांना दाखवते. आमच्याकडे जवळपास ५८ पेक्षाही अधिक मांजरी आहेत. त्यातलेच एक मांजर पायाने अधू होते. तिचा धक्का लागल्यामुळे मूर्ती भंगली. त्यामुळे आम्हाला गेल्यावर्षी नवीन मूर्ती घ्यावी लागली. नाहीतर आमच्याकडे नवी मूर्ती आणत नाहीत आणि तिचं विसर्जनही करत नाहीत.

गणपतीला बुद्धीचा देवता म्हटले जाते. विनायकाकडे बुद्धी मागण्याचे विचार लहानपणापासूनच माझ्यावर बिंबवण्यात आले आहेत. सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू दे, अशीच प्रार्थना मी बाप्पाकडे केली.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav 2017 marathi actress urmila nimbalkar sharing her ganesh festival memories from childhood