गणपती ही अशी देवता आहे जी विविध मार्गांनी आणि विविध रुपांना प्रत्येकाच्याच मनात आरुढ असते. नानाविध रुपांनी आणि नानाविध कारणांनी प्रत्येकजण या देवतेची पूजा करत असतो. बाप्पाची अशीच मनोभावे पूजा करणारी एक अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. माहेरचा गणपती ही संकल्पना मयुरीसाठी तशी नवीनच. कारण, तिच्या माहेरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. पण, माहेरी गणपती नसला तरीही मयुरीने ती सर्व कसर इमारतीच्या गणेश उत्सवामध्ये भरुन काढली. त्यामुळे एका अर्थी हा इमारतीचा गणपतीच तिच्या माहेरच्या गणपतीप्रमाणे आहे असं म्हणायला हरकत नाही. याच लाडक्या बाप्पाविषयी सांगताना मयुरी म्हणते….

माझ्या माहेरी गणपती येत नाही. पण, माहेरचं घर असलेल्या इमारतीत मात्र गणेश उत्सवाची धूम असायची. चर्चगेटला आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिथे सर्वजण सरकारी नोकरदार वर्गातील मंडळीचीं कुटुंब होती. तिथे बरीच कुटुंब बदली होऊन आलेली होती. त्यामुळे फार कोणाशी ओळखही नसायची. पण, गणेशोत्सव हा एक असा सण होता ज्यावेळी सर्वजणांची ओळख व्हायची, गप्पा रंगायच्या आणि धमाल असायची. माझा मोठा भाऊ गणपतीच्या दिवसांमध्ये इमारतीच्या गणेश उत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी व्हायचा. तो एक प्रकारचा वेगळाच उत्साहच असायचा. गणेशोत्सवादरम्यान कल्ला, उत्साह आणि नव्या चेहऱ्यांची होणारी ओळख असाच एकंदर सर्व माहोल असायचा.

आमच्या या उत्साहामध्ये साथ असायची ती म्हणजे, विविध खेळांची. त्यासोबतच दरवर्षी एक प्रकारची थीम असायची. त्यामुळे त्या थीमला अनुसरुन उत्सव साजरा करण्याचाही आमचा कल असायचा. इमारतीच्या गणेश उत्सवामध्ये रांगोळी स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून ते अगदी इतरही स्पर्धांमध्येही मी सहभागी व्हायचे. त्यामुळे आपल्यातील कलाकाराला वाव देणारा उत्सव म्हणूनही मी या सणाकडे पाहते. उत्साहपूर्ण वातावरणात अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे आपल्या आपली कला इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळते.
लग्नानंतरचा यंदाचा हा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास आहे. कारण, माझ्या सासरी महालक्ष्मींचं आगमन झालं होतं. त्यामुळे या उत्सवाचा भाग होण्याची मलाही संधी मिळाली. तो एक वेगळाच अनुभव होता. हाच उत्साह आमच्या ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेच्या सेटवरही आहे. गणेशोत्सव म्हटल्यावर आनंद आणि उत्साहासोबतच चंगळ असते ती खाद्य पदार्थांची. आमच्या सेटवरही हा उत्सव साजरा होतो. यामध्ये पुढाकार असतो तो म्हणजे संजय मोने यांचा. बाप्पा आपल्या घरी विराजमान झाल्यापासूनच सर्वत्र एक वेगळ्या प्रकारची उर्जा पाहायला मिळते. मीसुद्धा दरवर्षी या उत्सवाचा आनंद घेते. त्यातही सिद्धीविनायकाच्या आणि लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्याचाही माझा प्रयत्न असतो. या बाप्पांचं मी अगदी न चुकता दर्शन घेते. त्यामुळे यंदाही माझा तो प्रयत्न असणार आहे.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

गणेशोत्सव कोणाला आवडत नाही? पण, या उत्सवाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवत चालला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या या उत्सवात आता स्पर्धात्मक आणि चढाओढीच्या वृत्तीला वाव मिळू लागला आहे. हा सण धुमधडाक्यात साजरा करण्याच्या विरोधात मी नाही. पण, लाऊड स्पीकर आणि आपल्या अतिउत्साहीपणाचा आजूबाजूच्या मंडळींना त्रास होता कामा नये, ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. काही गोष्टींसाठी आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे. याची सुरुवात कोणातरी केली पाहिजे. त्यामुळे यंदाच्या या गणेश उत्सवात आपल्यातील सुजाण नागरिकाला पुन्हा जागं करा आणि गालबोट न लावता बाप्पांचा पाहुणचार करत उत्सवाचा आनंद घ्या.

Story img Loader