नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गणपतीची आराधना करताना ऊर्जा आणि सकारात्मकतेचा अनुभव येतो. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करुन देणारा, पाऊल टाकण्याचे सामर्थ्य देणारा देव म्हणजे कला आणि विद्येचा अधिपती गणपती. गणेशोत्सवात आजूबाजूचं वातावरण मन प्रसन्न करून जातं. ढोल-ताशांचा गजर, आरत्या यांमुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आणि हा उत्साहच मनाला खूप भावतो,’ या शब्दांत नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर हिने गणेशोत्सवाच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. या उत्सवाशी निगडीत प्रत्येकाच्याच अनेक आठवणी असतात. गणेशोत्सव हा शब्द ऐकताच तिच्याही मनात अशाच अनेक आठवणी उफाळून आल्या.

‘मी खूप देव देव करणारी नाही. मात्र या उत्सवातून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आमच्या इमारतीत काही जणांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. सजावटीला, आरतीला मी नेहमीच त्यांच्या घरी जायचे. गणेशोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या जायच्या. तेव्हा पहिल्यांदा मी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला. मंचावर अनेक प्रेक्षकांसमोर परफॉर्मन्स करण्याचा पहिला अनुभवसुद्धा मला गणेशोत्सवातच मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा होण्याचा आनंद तेव्हापासूनच मिळत गेला,’ असं ती म्हणते.

वाचा : माहेरचा गणपती : उत्सवाच्या अतिरेकापेक्षा मनोभावे पूजा महत्त्वाची- अनुराधा राजाध्यक्ष

धूमधडाक्यात हा उत्सव सगळीकडे साजरा होत असतानाच त्याला व्यावसायिक स्वरुप देण्यात आल्याचीही भावना फुलवाने व्यक्त केली. याबद्दल ती पुढे म्हणते की, ‘माझ्या काकींकडे गणपतीची प्रतिष्ठापना होते. मात्र, त्या पुण्यात राहत असल्याने दरवर्षी तेथे जाणं शक्य होत नाही. पण माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडे मी आवर्जून गणपती दर्शनाला जाते. लालबागला आमचं दुकान आहे. त्यामुळे तिथे मी दरवर्षी जाते. मात्र आता या उत्सवाला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालंय असं वाटतं. अनेक ठिकाणी पैसे देऊन दर्शनाची वेगळी रांग केली जाते, हे मनाला पटत नाही. त्यातच गर्दी आणि धक्काबुक्की या गोष्टींमुळे माझ्या मुलीला मी आता देखावे दाखवायला नेऊ शकत नाही.’

शब्दांकन- स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav 2017 marathi choreographer phulwa khamkar sharing ganesh festival memories