‘बंधू येईल माहेरी न्यायला.. गौरी गणपतीच्या सणाला..’ हे गाणं प्रत्येक सासुरवाशिणीच्या हृदयाच्या अगदी जवळचं. अगदी या मॉडर्न दिवसांमध्येही या गाण्याचं फार महत्त्व आहे. माहेरच्या गणपतीच्या गोष्टी आणि त्याचा उत्साह इतरांना सांगण्यासाठी विवाहित महिला जितक्या उत्सुक असतात तितकीच त्यांच्या मनात एक प्रकारही रुखरुखही असते. अशीच काहीशी रुखरुख ‘लव्ह लग्न लोचा’ फेम अभिनेत्री अक्षया गुरव हिच्या मनातही आहे. गणपती बाप्पा आणि अक्षया हे नातंच काहीसं वेगळं आहे. तिच्यासाठी बाप्पा बऱ्याच कारणांनी महत्त्वाचा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता तो नेमका का महत्त्वाचा आहे हे खुद्द अक्षयाच सांगतेय…
‘इतक्या वर्षात पहिल्यांदाच मी माझ्या स्वत:च्या घरच्या गणपतीला नाहीये, याविषयी माझं पतीसोबत (भूषणसोबत) बोलणंही झालं. माझ्या माहेरी बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान असतात. दरवर्षी माझी वहिनी, बहिण, मी आम्ही सगळ्याजणी आईच्या मदतीला असतो. पण, यंदा प्रत्येकजण आपापल्या कामात, आपापल्या घरी आहेत, त्यामुळे आईच्या हाताशी कोणीच नाहीये. त्यामुळे मला त्याचीही खंत वाटतेय. दहा दिवसांचा माहेरचा गणपती मला यंदा अनुभवता येणार नाही, याची एक प्रकारची रुखरुख आहे. पण, तोच आनंद मला सासरी मिळणार आहे. कारण, माझ्या सासरी दीड दिवसांचा गणपती येतो. इथला हा माझा पहिलाच गणेश उत्सव आहे. त्यामुळे एक प्रकारचा वेगळाच उत्साह आहे.
वाचा : माहेरचा गणपती : मालवणी भाषा एवढी ऐकायचे की ती वर्षभर पुरायची- नेहा राजपाल
माझ्यासाठी गणेश उत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि भरभराटीची उधळण अशीच काहीशी संकल्पना आहे. आमच्या आजोबांच्या घरी बाप्पा असायचे, त्यानंतर माझ्या काकांकडे बाप्पा येऊ लागले आणि काका गेल्यानंतर आम्ही बाप्पाला आणू लागलो. त्यामुळे एक प्रकारची परंपराच आमच्या कुटुंबात सुरु असल्यामुळेच या उत्सवाच्या दिवसांमध्ये माझा उत्साह ओसंडून वाहात असतो. आमच्या घरी येणारा बाप्पा नेमका कसा असेल, हे आम्हालाही ठाऊक नसतं. त्यामुळे बाप्पाच्या येण्याची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचलेली असते. दहा- बारा दिवसांसाठी येणाऱ्या या लाडक्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी माझ्या माहेरी सुरु असतेच. त्यातच बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची वर्दळ आणि त्यांचा उत्साह पाहून एका वेगळ्याच चैतन्याची अनुभूती मला होते.
वाचा : भजन, खटखटे लाडू आणि अमाप उत्साह..
गणपती म्हणजे विद्येची देवता, कलेची देवता असं म्हणतात. पण, मला आतापर्यंत ज्या गणपतीची ओळख आहे तो म्हणजे इच्छापूर्ती करणारा बाप्पा. आमच्या घरात विराजमान होणारा बाप्पा नवसाला पावतो असं अनेकांचच म्हणणं आहे. किंबहुना ज्यांच्या इच्छा हा बाप्पा पूर्ण करतो ते दरवर्षी न चुकता दर्शनासाठी येतात. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. माझ्या स्वत:च्या अनुभवाविषयी सांगावं तर, गणपतीच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये, काही दिवसांमध्ये मी अगदी निवांत असते. कामाची, नव्या प्रोजेक्टची कोणतीच गडबड नसते. पण, गणपतीच्या येण्यासोबत बऱ्याच सकारात्मक उर्जेसह माझ्याकडे काही प्रोजेक्ट्सही येतात. हा योगायोग समजा किंवा याला इतर काही नाव द्या. पण, हे असं बऱ्याचदा झालं आहे. गेल्या वर्षीसुद्धा अशाच माहोलात मला ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेसाठी विचारण्यात आलं होतं. त्यामुळे हा बाप्पा माझ्यासाठी नेहमीच खास होता, आहे आणि असाच खास राहिल. गणपती बाप्पा मोरया…!’
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@loksatta.com