सुरक्षा परीक्षण, प्रशिक्षण कार्यशाळेला मुंबईतून अवघ्या २०० मंडळांचा प्रतिसाद
गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये आगीसारखी कोणतीही दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत त्याच्याशी कसे तोंड द्यायचे, याची माहिती देण्यासाठी महापालिका आणि ‘फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्यामार्फत होणाऱ्या सुरक्षा परीक्षणाला गणेशोत्सव मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात पालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळांनाही अनेक मंडळांनी दांडी मारली आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान गणेशभक्तांच्या सुरक्षेबाबत मंडळे बेफिकीर असल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देशभरातून मुंबईत लोक येत असतात. या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह इतर सर्व यंत्रणा सज्ज होतात. मात्र सर्वाधिक काळ मंडळाच्या मंडपामध्ये असलेल्या या भाविकांच्या सुरक्षेसाठी तेथील सुरक्षेबाबत अधिक सजग असणे आवश्यक आहे. भाविक मंडळांनी उभारलेल्या मंडपात तासनतास उभे असतात. यामुळे या ठिकाणच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. याचबरोबर उत्सवादरम्यान जर कोणतीही आपतकालीन परिस्थिती उद्भवली तर सरकारी यंत्रणांची मदत पोहचेपर्यंत बचाव कार्य कसे करायचे याबाबत कार्यकर्ते प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. याकडे मंडळांनी आतापर्यंत फारसे लक्ष दिले नाही. यामुळे यावर्षी महापालिकेने पुढाकार घेऊन आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये उत्सवादरम्यान कोणतीही आपत्ती ओढवली तर त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे याबाबत प्रशिक्षण दिले जाते. शहरात चार कार्यशाळा पार पडणार असून यापैकी दोन कार्यशाळा पार पडल्या. या कार्यशाळांना अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे.
दुसरीकडे मंडपात कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी उत्सवापूर्वी सुरक्षेचे परीक्षण करून देणाऱ्या ‘फायर अँड सिक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेलाही मंडळांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेमार्फत मंडळांनी मंडपात कोणते सुरक्षा उपाय केले आहेत याचे परीक्षण केले जाते. हे परीक्षण करत असताना संस्थेतील तज्ज्ञ अभियंते आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस प्रतिनिधी यांचा चमू मंडळाच्या मंडपाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतो. यानंतर सर्व बाबींचा अभ्यास करून त्यांना आवश्यक त्या उपाययोजना सुचविल्या जातात. त्याची अंमलबजावणी केल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी होते. संस्थेतर्फे या सुरक्षा उपायांचे पालन करणाऱ्या मंडळांना पारितोषिकही दिले जाते. मुंबईतील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ अभियंत्यांची ही संस्था असून ते हे परीक्षण मोफत करून देतात. असे असले तरी मंडळे ते करून घेण्यास फारशी इच्छुक नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा उशिरा सुरू झाल्या आहेत. या कार्यशाळा किमान एक महिना आधी तरी सुरू होणे अपेक्षित आहे. तसे झाले असते तर यांना अधिक प्रतिसाद मिळाला असता. सुरक्षेचे उपाय म्हणून मंडळांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असतेच. पण आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
– अॅड्. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.
आम्ही गेल्या सात वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षा परीक्षणाचे काम करत आहोत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मंडळांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होत आहे. मागच्यावर्षी २०० मंडळांनी सुरक्षा परीक्षण करून घेतले होते.
– श्रेयस सरमळकर, फायर अँड सिक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडिया