तेव्हा आणि आता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सवातील साधेपणा हा केव्हाच मागे पडला आहे. उत्सवाच्या विस्ताराबरोबर त्याचे स्वतंत्र अर्थकारण तयार झाले आणि त्याकडे उद्योग क्षेत्रानेही लक्ष वळवले. लोकांचा म्हणून सुरू झालेला उत्सव हळूहळू जाहिरातदारांचा किंवा प्रायोजकत्व देणाऱ्या बडय़ा कंपन्यांचा झाला. मात्र उत्सवाच्या दहा दिवसांतील अवाढव्य उलाढालीने अनेक घटकांना रोजगारही दिला आहे.

साधेपणाने सुरू झालेल्या गणेशोत्सवाने दिमाखदार रुपडे स्वीकारायला सुरुवात केली. ‘आपला’ उत्सव मानून नागरिकांनीच या उत्सवाला मोठे केले. उत्सव मोठा होत गेला त्यानुसार अनेक घटक या उत्सवाचा अविभाज्य भाग बनले. त्यातून उत्सवाचे अर्थकारण मोठे होत गेले. मंडळांचा मांडव घालणारे, गणेश मूर्तीचे निर्माते, विविध प्रकारची सजावट करणारे, करमणुकीच्या कार्यक्रमाचे निर्माते, प्रकाश योजना, ध्वनिव्यवस्था, ढोल-ताशा पथके, बँडवाले, पौरोहित्य करणारे, प्रसादाची व्यवस्था करणारे, दागिने घडवणारे, उत्सवाच्या काळात फिरणारे विक्रते, उत्सवाच्या पत्रिका, फलक तयार करणारे असे अनेक घटक या उत्सवी बाजारपेठेचा भाग झाले. अनेक घटकांना या उत्सवाने रोजगाराच्या मोठय़ा संधीही दिल्या. या सगळ्या घटकांनी मिळून असणारी उत्सवातील उलाढाल ही शेकडो कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. उत्सवाची लोकप्रियता, हक्काचा ग्राहकवर्ग आणि झगमगाटी स्पर्धेत टिकून राहण्यासाठीही मंडळांची गरज हेरून उद्योग क्षेत्राने उत्सवात शिरकाव केला आणि लोकांचा असलेला उत्सव गेल्या काही वर्षांत सहजपणे जाहिरातदारांचा झाला.

लोकवर्गणीचा आधार

सुरुवातील आर्थिक, सामाजिक स्थैर्य असलेल्या अनेकांनी उत्सव सुरू केला. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी यांनी या उत्सवाचा आर्थिक भार उचलला. उत्सवाला अगदी पहिल्या वर्षीपासून लोकांचा प्रतिसाद मोठा असला तरीही त्यात साधेपणा होता. माफक सजावट, घरगुती प्रसाद, साधेपणानेच तरीही उत्साहाने निघणारी मिरवणूक असे उत्सवाचे स्वरूप होते. उत्सव मोठा झाला तो लोकसहभागातून. या उत्सवाला लोकांनीच आर्थिक हातभार लावला. अगदी बहुतेक सर्व मंडळे लोकवर्गणीतून उत्सव साजरा करत होती. घरोघरी जाऊन लोकांना पटवून वर्गणी गोळा करायची हा शिरस्ता अगदी नव्वदच्या दशकापर्यंत सुरू होता. वर्गणी दिल्यामुळे किंवा एखादी जबाबदारी उचलल्यामुळे नागरिकही उत्सवाशी जोडले जात होते. मिळालेल्या वर्गणीचा हिशोब करून त्यानंतर काय सजावट करायची हे सार्वजनिक मंडळे ठरवत असत. कालौघात उत्सवातील राजकीय हस्तक्षेप वाढला, सार्वजनिक मंडळांच्या देणग्यांच्या रकमा वाढल्या. त्यातून मंडळांमध्येही आर्थिक चढाओढ सुरू झाली. काही मंडळांना देवस्थानाचे स्वरूप आले आणि गणेशोत्सव हे स्थानिक बाजारपेठेच्या अर्थकारणातील महत्त्वाचा भाग झाला.

प्रायोजकांचा उत्सव

सध्या मध्यम स्वरूपातील एखाद्या मंडळाचा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतील खर्च हा ८ ते १० लाख रुपये येतो. मंडळ जेवढे मोठे आणि प्रतिष्ठित तेवढा हा खर्च वाढत जातो. एकाच गल्लीत चार ते पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करून उत्सव करणे हळूहळू बंद झाले. मात्र त्याचवेळी उत्सवाचा खर्चही मोठय़ा प्रमाणावर वाढत होता. त्यातून वर्गणीसाठी होणारी गुन्हेगारी हा या उत्सवाला गेल्या काही वर्षांमध्ये लागलेला डाग. मंडळांची आर्थिक स्पर्धा ही नव्वदच्या दशकानंतर शिगेला पोहोचली. ती उद्योगांच्या पथ्यावर पडली. उत्सव हा वेगवेगळ्या प्रायोजकांनी वेढून टाकला. सध्या रस्त्यावरील कमानी, मंडळांचे मंडप इतकेच काय तर मंडळाच्या देखाव्यांनाही प्रायोजक आहेत. मिरवणुकीतून पत्रके वाटून, पथके उभी करून वेगवेगळे उद्योग आपली जाहिरात करत असतात. देखाव्यांमधून होणाऱ्या समाजप्रबोधनाची जागा आता उत्पादनांच्या जाहिरातींनी घेतली आहे. मंडपात गणेशाच्या प्रसादाबरोबर शाम्पू, तेल, यांची पाकिटे वाटली जातात.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry sector focus ganesh festival for advertisement