धार्मिक कार्यक्रम, अन्नदान, रक्तदान, विद्यार्थी मदत कार्यक्रमातून समाजाशी नाळ

केवळ गणेशोत्सवापुरते सार्वजनिक मंडळाचे अस्तित्व न ठेवता निगडीतील जय बजरंग तरूण मंडळाने वर्षभर विविध उपक्रमांचे सातत्य ठेवले आहे. धार्मिक कार्यक्रम, अन्नदान, रक्तदान, विद्यार्थ्यांना मदत, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दीपोत्सव अशा भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून मंडळाने समाजाशी नाळ जोडलेली आहे.

जवळपास ६० वर्षे जुने असलेल्या या मंडळाचे उपक्रम वर्षप्रारंभ झाल्यापासूनच सुरू होतात. एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग असतो. पंढरपूरला निघालेल्या पालखी सोहळ्यात संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. मंडळाचे संस्थापक व पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर मधुकर पवळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक ऑगस्टला वृक्षारोपण, अपंग शाळेत अन्नदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते. श्रावण महिन्यात महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

गणेशोत्सवात पर्यावरणपूरक देखावे सादर करण्याकडे मंडळाचा कल राहिला आहे. सुमारे ४० वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने गेल्या काही वर्षांपासून प्राधान्याने धार्मिक व सामाजिक विषयावर आधारित सजावट व देखावे केले आहेत. त्यातून प्रभावीपणे सामाजिक संदेश दिले आहेत. विसर्जन मिरवणुकीत गुलाल न उधळण्याची ,तसेच फटाके न वाजवण्याची मंडळाची परंपरा कायम जपली गेली आहे. यंदाही तोच संकल्प राहणार आहे. यंदाच्या उत्सवात ‘कालिकामातेचा महिमा’ हा पौराणिक देखावा मांडण्यात आला आहे. नवरात्र उत्सवात रास गरबा, दांडियासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिवाळीत पाडव्याच्या दिवशी भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानात दीपोत्सव साजरा करण्यात येतो, त्यामध्ये परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होतात. जवळपास १५ हजार दिवे यानिमित्ताने प्रज्वलित करण्यात येतात. वर्ष संपताना दत्तजयंतीचा सोहळा मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. मंडळाच्या उपक्रमशीलतेचे विविध संस्था, संघटनांनी पुरस्कार देऊन कौतुक केले आहे.

माजी महापौर मधुकर पवळे मंडळांचे संस्थापक आहेत. माजी नगरसेवक दत्ता पवळे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. लहू धुमाळ उत्सवप्रमुख असून संदीप कवडे, विजय गांगुर्डे, अभिजित भालसिंग आदी प्रमुख कार्यकर्ते आहेत.

Story img Loader