ऐरवी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ३० ते ३५ तास रांगेत उभे राहावे लागते, मात्र मंगळवारी अवघ्या पाच मिनिटांत राजाचे दर्शन होत होते. पावसाच्या जोराने वाहतूक ठप्प असल्याने घराकडे निघालेल्या अनेक भाविकांनी या संधीचा फायदा घेत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबाग, परळ या परिसरातील गणेश मंडळांमध्ये पाणी साचल्याने अनेक मंडळांनी दर्शन बंद ठेवले होते.

चिंचपोकळी स्थानकाच्या परिसरात चार फूट पाणी साचल्याने या परिसरातील मोठमोठय़ा गणेश मंडळांना याचा फटका सहन करावा लागला. हा भाग सखल असल्याने येथे सर्वाधिक पाणी साचते. चिंचपोकळीजवळील चिंतामणी या गणेश मंडळात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. गणेशमूर्तीच्या स्टेजपर्यंत पाणी पोहोचल्याने दर्शनाची रांग बंद ठेवण्यात आली होती, तर लालबाग राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित नसल्याने पोलिसांनी तेथील परिस्थिती सांभाळली. लालबागच्या मुखदर्शनाची रांग भाविक नसल्याने बंद ठेवण्यात आली होती, तर नवसाच्या रांगेत १५० ते २०० भाविकच उपस्थित होते. त्यामुळे या रांगेतून सुमारे पाच ते दहा मिनिटांत राजाचे दर्शन होत होते. यातही घराकडे परतीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती. मंगळवारी टाटा रुग्णाल़ात प्रशिक्षण असल्याने डॉ. देवेंद्र श्रीवास्तव पुण्याहून मुंबईला आले होते. मात्र मुसळधार पावसाने प्रशिक्षण रद्द झाले असल्याने त्यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र दुपारनंतर वाढणाऱ्या पावसामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

गणेशगल्ली मंडळातही हीच परिस्थिती होती. या गणेश मंडळात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने दर्शनाच्या रांगा बंद होत्या. यावर अनेक गणेश मंडळांनी पावसात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी मदतकार्य सुरू केले होते. वडाळ्याच्या राम मंदिराच्या जीएसबी गणेश मंडळांने नागरिकांसाठी मोफत अन्न व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे नागरिकांनी मदतीसाठी या परिसरात यावे, असे आवाहन समाज माध्यमातून करण्यात आले आहे, असे जीएसबी मंडळाचे अध्यक्ष उल्हास कामत यांनी सांगितले.

ढोलपथकाच्या ऑर्डर रद्द

आज पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन असल्याने कल्याण, ठाणे या परिसरात जाणाऱ्या अनेक ढोल पथकांच्या ऑर्डर रद्द झाल्या. आम्ही ढोलकर हे पथक कल्याण येथे पाच दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनसाठी निघाले होते. मात्र दादर परिसरात त्याचा ट्रक अडकला होता व त्यामध्ये पाणी गेल्याने त्याचे ढोल व संगीताची उपकरणे पाण्यात भिजली. यामुळे या ढोल पथकाला आर्थिक फटका बसला. तर या दिवसाच्या ऑर्डर रद्द झाल्याने अनेक ढोल पथके दादर, घाटकोपर या स्थानकावर दिसत होते.

Story img Loader