इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण हल्ली वाढताना दिसते. मग त्यासाठी काहीजण घरी गणेश मूर्ती तयार करतात, तर काही शाडूच्या मातीची मूर्ती आणतात. मात्र भांडूपमधील शिवसाई मित्र मंडळ मागील दहा वर्षांपासून इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करतानाच वेगवेगळ्या माध्यमातून गणरायाची मूर्ती साकारत आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी चक्क ३० हजार जेम्सच्या गोळ्या वापरून बाप्पा साकारले आहेत.
हे मंडळ प्रत्येक वर्षी समाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याशी संबंधित गणरायाची मूर्ती तयार करते, असे मूर्तीकार सागर पवार याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले. यंदाच्या वर्षी मंडळाने बालक आणि पालक यांच्यामधील दुरावत चालेला संवाद, तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने बालक-पालकांमधील बिघडलेले नाते याच्याशी संबंधित देखावा तयार केला आहे. याच देखाव्याला साजेशी मूर्ती तयार करण्याच्या उद्देशाने सागर पवार आणि जगदीश गोळे यांनी गणेशोत्सवाच्या २० दिवस आधीपासूनच या जेम्सच्या बाप्पांची मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या रंगाच्या ३० हजार जेम्सच्या गोळ्या योग्य जागी लावत त्यांनी हा गोड बाप्पा साकारला आहे. वेगळ्या माध्यमातून गणपतीची मूर्ती साकारल्यावर जास्तीत जास्त लोकं आमच्या मंडळाला भेट देऊन त्यांच्यापर्यंत आमचा सामाजिक संदेश पोहोचावा हा आमचा हेतू असल्याचे सागरने सांगितले. आमचा हेतू साध्य होत असून, वेगळ्या प्रकारचे गणपती बघण्यासाठी नियमितपणे भक्त येत आहेत. स्थानिकांमध्ये हा गणपती लोकप्रिय झाला असून, लांबूनही या बाप्पाच्या दर्शनासाठी आता लोक येऊ लागल्याचे सागर म्हणाला.
वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेल्या गणेश मूर्तींमुळे या मंडळाचे बाप्पा मागील १० वर्षांपासून स्थानिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दरवर्षी देखाव्याला साजेशी मूर्ती साकारताना या मंडळाने मागील १० वर्षांमध्ये साखरेचा गणपती, गरम मसाल्याचा गणपती, कडधान्याचा गणपती, स्वयंप्रकाशित गणपती (रेडीयमचा), शाडूचा गणपती, कागदाचा गणपती, सुपारीचा गणपती आणि अगदी शेंगण्याचाही गणपती साकारला आहे. यंदाचा जेम्सचा बाप्पा साकारण्यासाठी अंदाजे २० ते २५ हजारांदरम्यान खर्च आल्याचे सागरने सांगितले.
१ लाख १०१ अगरबत्त्यांचा बाप्पा
भांडूपमधील शिवसाई मित्र मंडळाप्रमाणेच भायखळ्यातील मकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही अनोखी गणेश मुर्ती साकराली आहे. या गणेश मंडळाने तब्बल १ लाख १०१ अगरबत्तीच्या काड्यांपासून गणराय साकारले आहेत. केमिकल असणाऱ्या अगरबत्त्यांच्या वाढत्या वापराला विरोध करण्याच्या हेतूने नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अगरबत्त्यांपासून हा गणपती मंडळाने साकारल्याने मंडळाचे कार्यकर्ते रघुनाथसिंग ठाकूर यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ वेगवेगळ्या माध्यमातून गणपती साकारून सामाजिक संदेश देत आहे.