लवकरच रोबोट जगावर राज्य करतील, असे अनेकदा बोलले जाते. मात्र त्याला अजून बराच काळ जाईल हेही तितकेच खरे आहे. मात्र आता हळूहळू माणसांची अनेक कामे रोबोट करु लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क एक रोबोटिक हात गणरायाची पूजा करताना दिसतो आहे. याच व्हायरल व्हिडीओबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

गणपतीची आरती सुरु असताना आरतीचे ताट फिरवणाऱ्या रोबोटिक हाताचा व्हिडीओ आत्तापर्यंत तुम्हीही पाहिला असेल. अनेकांना हा व्हिडीओ कुठला आहे, कोणी हा हात तयार केला आहे? हा सार्वजनिक गणपती आहे की घरगुती असे अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र रोबोटकडून पूजा होत असणारा हा गणराय पुण्यातील आहे. पुण्यामधील पाटील ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड (पीएपीएल) कंपनीमधील गणरायाची ही खास हायटेक पूजा आहे. पुण्यातील चाकण एमआयडीसी येथील ही  कंपनी रोबोटिक्स आणि रोबोटिक वेल्डींगमधील कंपनी असून, त्यांनी आपल्या गणरायांच्या सेवेसाठी हा खास आरती करणार हात तयार केला असल्याचे कळते. हा व्हिडीओ गणेशोत्सवाच्या सुरवातीपासूनच अनेक व्हॉटस्अॅप ग्रुप, फेसबुक पेजेस आणि सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झालेला दिसतो आहे.

अॅप्लिकेशनवरील मंत्र, भजन, अभंगांनंतर आता आरती करणाऱ्या रोबोटमुळे भविष्यात लवकरच गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि विसर्जनसाठीही रोबोट्सचा किंवा उच्च तंत्रज्ञानाचा वापर झाला तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, असेच म्हणावे लागेल.

Story img Loader