गणपती बाप्पा, त्यांचे वाहन उंदीर आणि त्या बाजूला शंकराची पिंड, २०० फूट रूंद आणि ४०० फूट उंची असलेला हा महागणपती औरंगाबाद जिल्ह्यातील खिर्डी या ठिकाणी साकारण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन एकर शेतात विराजमान झालेल्या या बाप्पांची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. पर्यावरण स्नेही असे हे गणेशाचे रूप पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मागील दोन महिन्यांपासून गहू, मका, हरभरा आणि ज्वारी या धान्यांची कलात्मकपणे लागवड करून गणपती बाप्पाचे हे गोजिरे रूप साकारण्यात आले आहे.
गणपती बाप्पाचे हे रूप एकाच वेळी डोळ्यात साठविण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावा लागतो आहे. कुलस्वामिनी प्रतिष्ठानाच्या वतीने गणेश भक्तांना हा गणपती पाहण्याची सोय करण्यात आली आहे. कुलस्वामिनी गणेश मंडळाचे विलास कोरडे आणि अलका कोरडे यांच्या संकल्पनेतून हा गणपती आकाराला आला. दोन महिन्यांपूर्वी १० किलो गहू, १५ किलो मका, ३ किलो हरभरा आणि १० किलो ज्वारी या सगळ्या धान्याची कलात्मक पद्धतीने लागवड करण्यात आली. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात गणपती साकारून पाऊस येण्याचे साकडेच मागितले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशाच्या आगमनाच्या दिवशीच बाप्पाचे हे रूप साकारले जाणार होते. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील शेततळ्यातले पाणी देऊन गणरायाचे हे रूप साकारण्यात आले असल्याचे कोरडे यांनी सांगितले आहे. हा गणपती साकारण्यासाठी धान्यासोबत बेडशीटचाही वापर करण्यात आला आहे. गणपतीचे गंध आणि जानवे हे बेडशीटच्या मदतीने तयार करण्यात आले आहे, अशी माहितीही कोरडे यांनी दिली आहे.