गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरांतील काही गणपतींची नावे विशेषत्त्वाने समोर येतात. त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे. बाहेरगावहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे. केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर, श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीने जगभरात नावलौकिक संपादन केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झालेली असून, ‘दगडूशेठ गणपती’ हा लौकिक प्राप्त झाला आहे ती मूर्ती मंडळाने १९६८ मध्ये तयार करून घेतली आहे. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या मूर्तिकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती. ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहेत. बैठय़ा मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुगूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्टय़. या डोळ्यांमध्येच मूर्तीची प्रसन्नता, सात्त्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते. मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.
उत्सव काळात पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे एक खास वैशिष्टय़ ठरले. पुढे १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकिकामध्येही भर घातली आहे.
गणेशोत्सव हा केवळ आपल्या मंडळापुरताच वलयांकित राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली. गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्वशीर्ष उपक्रम जगभर पोहोचला आहे. ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालविण्यात येत आहे. पिगोरी (ता. पुरंदर) गावामध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजनसेवा दिली जात आहे.
ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू असतो. मागील वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त गणपतीला नवीन अलंकाराने सजवण्यात आले. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी यंदा ४० किलो वजनाचे नवीन अलंकार करण्यात आले आहेत. साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्णमुकूट, सूर्यकिरणांची नक्षी असलेले व रंगीत रत्नखडे जडवलेले कान, सातशे ग्रॅम वजनाचे शुंडाभूषण यासह रेशमी वस्त्रावर सोन्याच्या बुट्टय़ा विणून तयार केलेला पोशाख व उपरणे या गणेशोत्सवात मूर्तीस अर्पण करण्यात येणार आहे. पु. ना. गाडगीळ सराफ यांनी हे अलंकार घडवले आहेत. ५० कारागिरांनी पाच महिने अनेक तास काम करून मूर्तीचे दागिने घडविले आहेत.