गणपतीमध्ये साधारण तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन केले जाते. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. यावेळी
गौरी आली, सोन्याच्या पावली…
गौरी आली, चांदीच्या पावली…
गौरी आली, गाई वासराच्या पावली…
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…
असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. १५ सप्टेंबरला शनिवारी दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे दिवसभर कधीही गौरी आवाहन केले तरी चालेल. रविवार दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे रविवारी दिवसभरात कधीही गौरीपूजन केले तरी चालेल असे ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काही जणांक़े तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.

ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार गौरीला नैवेद्य दाखवून मुखवटे हलवून ठेवले जातात. काहीजणांकडे गौरीसोबतच गणपतीचे विसर्जन होते. तर काहींकडे गौरींचे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे गौरी आणि गणपतीची भेट होतच नाही असेही म्हटले जाते. अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो. मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा उत्सव ही मराठी संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे, असे म्हणता येईल.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav celebration 2018 gauri pujan important time and rituals