चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या बुद्धीच्या देवतेच म्हणजेच गणरायाच्या आगमाची तयारी सुरू झाली आहे. आता पुढचे दीड ते अकरा दिवस अनेकजण आपापल्या परीनं बाप्पाची सेवा करणार आहेत. तेव्हा घरघुती बाप्पांची मूर्ती निवडताना ती कशी असली पाहिजे, ती लहानच का असली पाहिजे यासारख्या प्रश्नांची उत्तर आपण पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांच्याकडून ‘प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे’च्या विशेष भागात जाणून घेणार आहोत.
घरी गणेशाची स्थापना करताना गणेशमूर्ती लहानच असली पाहिजे, याबाबतीतचे काही नियम आहेत काय ?
घरातील गणेशाची मूर्ती साधारण वीतभर उंचीची असावी असा संकेत आहे. गणेशाची मूर्ती केवढी असावी असा कोणताही नियम नाही. मात्र पूजनाच्या दृष्टीने आणि १० दिवस ती नीट रहावी यादृष्टीने काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एकवीत उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टीक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्यतो चिकणमाती, शाडूची असावी.
गणेशाची मूर्ती घरात स्थापन करताना काही जणं एकावेळी दोन मूर्त्यांची स्थापना का करतात ?
घरामध्ये एका वेळेस दोन मूर्तींची स्थापना करण्याची काहीच आवश्यकता नाही. एका घरामध्ये पूजेत एकच मूर्ती असावी.