गणपती बाप्पा आता अवघ्या काही तासांत आपल्या घरात विराजमान झाला असेल. मग या बाप्पाला आवडणारा आणि घरातील मंडळींना खुश करणारा मोदक तर व्हायलाच हवा. उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आपल्याला माहित असतात पण त्याशिवायही थोडे हेल्दी आणि तरीही पारंपारिक मोदकासारखेच असणारा थोडा वेगळआ प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता. पाहुयात असाच थोडासा आगळावेगळा ड्रायफ्रूट मोदक
पारीसाठी साहित्य :
तांदळाचे पीठ – दिड कप
मीठ – चवीनुसार
तेल – गरजेनुसार
सारणासाठी साहित्य :
किसलेला बदाम – पाव चमचा
खजुराचे तुकडे – अर्धा चमचा
कोरडे खोबरे – १०० ग्रॅम
आक्रोड – पाव कप
काजू – पाव कप
जर्दाळू – पाव कप
बेदाणे – पाव कप
केशर – गरजेनुसार
तूप – अर्धा चमचा
वेलची पावडर – चिमूटभर
साखर – पाव कप
कृती :
– प्रथम एका भांड्यात एक चतुर्थांश भाग पाणी घेऊन त्यात १ लहान चमचा तेल घालून हे पाणी गरम करावे.
– पाणी उकळत असताना त्यात हळूहळू तांदूळाचं पीठ घालून सतत एका बाजूने ढवळत रहावे. यावेळी पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
– पीठ या गरम पाण्यात चांगलं एकजीव झाल्यानंतर या भांड्यावर काही काळ झाकण ठेवा. ज्यामुळे पीठ गरम पाण्यात नीट एकजीव होऊन मोदकाला आवश्यक असलेली पारी तयार करण्यास सहज शक्य होईल.
– त्यानंतर हे पीठ एका मोठ्या परातीत घेऊन ते चांगलं मळून घ्यावं. यावेळी पीठ मळताना हाताच्या तळव्यांना तेल लावावे. जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. त्यानंतर या पीठाचा मऊसर असा गोळा तयार करावा.
– यानंतर एका पातेल्यात शुद्ध तूप आणि वर दिलेले सारा सुकामेवा घालावा. त्यानंतर त्यात पीठीसाखर घालून काही वेळ मंद आचेवर गॅसवर गरम करावं. त्यानंतर तयार झालेलं सारण एका बाजूला काढून ठेवावं.
– आता तयार पीठाची लहानशी गोळी करुन त्याला हाताच्या तळव्याने थोडासा लहान पारीसारखा आकार द्यावा. यामध्ये एका चमच्याच्या सहाय्याने तयार सारण भरुन पीठाची पारी बंद करावी. ही पारी बंद करताना त्याला बोटांच्या सहाय्याने फुलांच्या पाकळीचा आकार द्यावा.
– पारीला फुलांचा आकार देत असताना हळूहळू या पारीचं तोंड बंद करावं. त्यानंतर मोदक तयार करण्याची पहिली पायरी पूर्ण होतं.
– मोदक तयार झाल्यानंतर एका मोदक पात्रात तळाला थोडसं पाणी घेऊन त्यावर मोदकपात्राच्या प्लेट्स ठेऊन मोदक ठेवावेत. हे मोदक १० ते १२ मिनीटे वाफवाते. त्यानंतर मोदक पात्राचं झाकणं काढून मोदक काढून घ्यावेत.