मुंबईतील प्रभादेवी येथील ‘श्री सिध्दीविनायक’ हा केवळ मुंबईकरांचाच नव्हे; तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर या मंदिराबाहेर भाविकांची रांग लागलेली असते. अगदी सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी सिध्दिविनायकाचे दर्शन घेऊन त्याच्या आशीर्वादाने शुभ कामाची सुरुवात करतात. दूरवरून अनवाणी आलेल्या आणि तासन् तास रांगेत उभ्या राहणाऱ्या भक्तगणांच्या चेहऱ्यावर बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच चमक दिसते. घरी जाताना सिध्दीविनायकाचे रूप डोळ्यांत साठवलेले असतेच; पण प्रत्येक भाविक सिद्धिविनायकाचा आशीर्वाद म्हणून मंदिरातर्फेच तयार केला जाणारा लाडू आणि नारळवडी हा ‘महाप्रसाद’ही न चुकता घेऊन जातो. अतिशय चविष्ट आणि स्वस्तात मिळणारा हा ‘महाप्रसाद’ नेमका कसा तयार होतो, याबाबत अनेकांना उत्सुकता असते. मागील वर्षी गणेशोत्सवानिमित्त पहिल्यांदाच हा चविष्ट प्रसाद कसा तयार होतो याबद्दलचा एक व्हिडीओ शूट करण्यात आला.
‘फूड सायकल’ या फूड ट्रॅव्हल व्लॉगच्या माध्यमातून बुंदीचे लाडू आणि नारळवडी कशी तयार होते, याचे चित्रण करण्यात आले आहे. बुंदी पाडण्यापासून लाडू बांधणीपर्यंत; त्याचप्रमाणे नारळाचा किस ते त्याची वडी तयार करणे, पॅकींग आणि वितरण अशी संपूर्ण प्रक्रिया विस्तृतपणे या व्लॉगमध्ये चित्रित करण्यात आलेली आहे. वीस वर्षांपासून मंदिराच्याच आवारात हा ‘महाप्रसाद’ तयार करण्याचे काम केले जाते. पण ‘फूड सायकल’ने पहिल्यांदाच व्हिडिओच्या माध्यमातून ‘महाप्रसादा’चे ‘मेकिंग’ भाविकांसमोर आणले आहे. या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे.
केंद्र सरकारच्या ‘एफएसएसएआय’ या खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासणाऱ्या संस्थेने केलेल्या परीक्षणात श्री सिध्दीविनायक मंदिराचा प्रसाद हा देशातील सर्व धार्मिक स्थळांच्या महाप्रसादांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ‘महाप्रसादा’चे महत्व अधिक वाढलेले होते. त्यामुळे आता ज्यांना या प्रसादाचे अप्रूप आहे आणि त्याचं महत्व इतरांना पटवून द्यायचे आहे, त्यांच्यासाठी ‘फूड सायकल’चा हा व्हिडिओ पर्वणीच ठरणार आहे.