गणेशोत्सवाच्या दहा दिवसात खरंच खूप मोठी ताकद आहे. कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते घ्या, त्यांची तळमळ ही वेगळीच असते. माझं मंडळ उत्कृष्ट कसं होईल याकडेच त्यांचं सगळं लक्ष असतं. गणपतीचे कार्यकर्ते हे खरंच वेगळेच असतात. जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसं सर्व कार्यकर्ते सगळं जग, सगळं घरदार सोडून, घरच्यांचे जोडे खाऊन सुध्दा फक्त आणि फक्त गणेशोत्सवाकडेच लक्ष देत असतात. अंगात संचारल्यासारखं कार्यकर्ते काम करत असतात. गणेशोत्सवामध्ये घड्याळात न पाहता रात्रंदिवस कार्यकर्ते काम करतात आणि त्याच्यामागे कुठला वैयक्तिक स्वार्थ नसतो त्यांचा, हे महत्त्वाचं. मग ते कुठल्याही मंडळाचे का असेना, ही ताकद फक्त तो बाप्पाच देऊ शकतो.
एक वेगळीच ताकद असते कार्यकर्त्यांमध्ये या गणेशोत्सवाच्या काळात. समाजातील अनेक लोक आम्हा कार्यकर्त्यांना सतत नावं ठेवतात, सतत चुका काढत असतात. गणेशोत्सवाला आणि कार्यकर्त्यांना नावं ठेवणे जसा यांचा छंदच. जरा सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांबद्दल विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांच्या चुका काढणं, त्यांच्यावर टीका करून काहीही फायदा नसतो. याकडे आम्ही कार्यकर्ते लक्षच देत नाही.
हेही वाचा – गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..
अत्यंत अवघड परिस्थितीतून कार्यकर्ते गणेशोत्सव साजरा करत असतात. अशा परिस्थितीत समाजाने आमच्या पाठीवर शाबासकीची एक थाप तरी जरुर मारावी एवढीच कार्यकर्त्यांची इच्छा असते. कार्यकर्ते जीवाचे रान करुन गणेशोत्सव साजरा करत असतात. काही मंडळांची वर्गणी अतिशय कमी असते अशा वेळी कार्यकर्ते खिशातून पैसे काढून गणेशोत्सव साजरा करतात तेव्हा ते विचार सुद्धा करत नाहीत. अशा आमच्या कार्यकर्त्यांवर तो चुकत असेल तर नक्कीच रागवा पण त्याला विश्वासात घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते नक्कीच चांगले काम करु शकतात.
हेही वाचा – दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते? जाणून घ्या
आज अनेक चांगले कार्यकर्ते या गणेशोत्सवातून घडत आहेत. गणेशोत्सव ही सार्वजनिक जीवनात राहावं कसं , व्यवहार कसा करावा ,पैसे कसे वापरावे , कोणत काम कसं करावं हे शिकवणारी शाळा आहे. यामध्ये काम करताना कार्यकर्ते चुकतही असतील पण चुकीचे नक्कीच नाहीत.
गणेशोत्सव हा आम्हा कार्यकर्त्यांचा प्राण आहे.
” सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा”. विसर्जनाच्या दिवशी हे वाक्य वाचून खरंच भरून येतं आणि संपूर्ण महिनाभर केलेल्या कष्टाचा थकवाच निघून जातो.
जय गणेश…
– प्रणव रमेश तांदळेकर, कार्यकर्ता
(अखिल विश्व मित्र मंडळ, सदाशिव पेठ, पुणे ३०)