गणपती बाप्पांचे आगमन हे सर्व गणेशभक्तांसाठीच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे आणि अवघ्या महाराष्ट्रीय जनतेसाठी अतिशय आनंदाचे असते. प्रत्येकाला गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याची ओढ लागलेली असते. म्हणून गणेशोत्सवाची चाहुल लागली की या सुमारास अवघ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षी गणपतीवर रचलेली नवनवीन चालींची नव्या रचनेची गाणी चित्रपटसृष्टीतील नवे-जुने, नवोदित संगीतकार-गीतकार करीत असतात. असेच एक वेगळ्या धाटणीचे गाणे गणपती बाप्पांवर तयार करण्यात आले आहे. प्रख्यात गायक आनंद शिंदे यांनी भुतियापंती या आगामी मराठी सिनेमासाठी हे गाणे गायले आहे.
तुला शोधू कुठे रे मोरया, तुला पाहू कुठे रे मोरया असे शब्द रचत गीतकार स्वप्नील चाफेकर ‘प्रीत यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हो तेज तू, आधार तू मायबापा असे सांगत श्रीगणरायाला मायबाप होण्याचे आवाहन या गीताच्या माध्यमातून स्वप्नील चाफेकर यांनी केले आहे.
व्ही बी. प्रॉडक्शनच्या भुतियापंती या आगामी मराठी सिनेमाचे निर्माते विनोद बरदाडे, नरेश चव्हाण असून दिग्दर्शनाची धुरा संचित यादव यांनी सांभाळली आहे. तर संगीताचे निर्माते यशवंत डाळ आहेत. अभिनय जगताप यांचे बहारदार संगीत या सिनेमाला लाभेल असून नृत्य दिग्दर्शन संतोष आंब्रे यांनी केले आहे. ‘मोरया मोरया ताल हा वाजला, गर्जती दाही दिशा’ असे म्हणत गीतकाराने चपखल शब्दांमध्ये गणपती बाप्पा हे सर्वांचेच कसे लाडके देैवत आहे, हे अधोरेखित केले आहे.