पुढील आठवडय़ात येऊ घातलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील बाजारात वर्दळ पाहायला मिळते आहे. दरवर्षी बाजारात दिसणारे टिकल्या, मणी, खडे, काचा लावलेले साहित्य यंदाही उपलब्ध आहेच. त्याशिवाय विक्रेत्यांनी अधिकाधिक कल्पक आणि आकर्षक साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. गणपतीसाठी तयार फेटा, कापडी घुमट आणि छत्री हे बाजारातील मुख्य आकर्षण आहे.
मोत्यांच्या माळा आणि सोनेरी, चंदेरी, रंगीत खडे लावलेला पुठ्ठय़ाचा फेटा आकारानुसार १०० ते १५० रुपयांना उपलब्ध आहे. कापडी फेटा तर आणखी स्वस्त म्हणजेच ९० रुपयांना आहे. सोनेरी रंगाच्या बेंटेक्सच्या मुकुटाची किंमत १३० ते १५० रुपयांपर्यंत आहे. गणपतीच्या आसनाच्या वरच्या बाजूला लावण्यासाठी लहान-मोठय़ा छत्र्याही खरेदीदारांच्या पसंतीस उतरत आहेत. छत्री आकारानुसार २०० ते ३०० रुपयांना मिळते. त्यासोबत ३०० रुपयांची मोटार खरेदी केल्यास छत्री गोल फिरत राहाते. बजेट थोडे जास्त असल्यास २ ते ३ हजारांदरम्यान कापडी घुमट उपलब्ध आहेत. यात संपूर्ण घुमट कापडी दोऱ्यांनी सजवलेला असतो व तीन बाजूंनी कापडी दोऱ्यांच्या माळा सोडलेल्या असतात.
गणपतीच्या कंठय़ांमध्ये यंदा फार नावीण्य दिसून येत नसले तरीही, पारंपरिक मोत्यांच्या आणि मण्यांच्या कंठय़ांना चांगली मागणी आहे. गणपतीच्या उंचीनुसार ८० ते ३५० रुपयांपर्यंत कंठय़ांची किंमत आहे. पर्यावरणस्नेही मखर म्हणून संपूर्ण पुठ्ठय़ाचे मखर कमी प्रमाणात का होईना उपलब्ध आहेत. दोन ते अडीच फुटाच्या गणपतीचे मखर १५०० रुपयांना मिळते. या मखरांना ग्राहकांची मागणीही चांगली आहे. आतापर्यंत ७० ते ८० पुठ्ठय़ाची मखरे विकल्याचे दादरला छबिलदासच्या गल्लीत मखर विकणारे अशोक पवार यांनी सांगितले. एलईडी लाइटच्या मखराची किंमत ३ हजार आहे. ज्यांना संपूर्ण मखर खरेदी करायचे नाही अशा ग्राहकांसाठी स्पंजची सजावट बाजारात उपलब्ध आहे. २ फु टांची स्पंजची कमान ६० रुपयांना मिळते. त्यावर कापडी आणि प्लास्टिकची फुले लावल्यावर सजावट अधिक उठावदार होते.
याशिवाय गणपतीचे चित्र असलेले टी-शर्ट्स लहान मुलांसाठी आकर्षण ठरत आहेत. हे टी-शर्ट्स अगदी १०० ते १५० रुपयांत सहज मिळतात. गणपतीच्या मागे लावण्यासाठी फुलांचे चित्र असणारे पुठ्ठे, टिकल्या चिकटवलेले कापड, नक्षीदार कापड असे पर्याय आहेत.