अष्टविनायक म्हटले की मोरगाव-लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यांची दोन दिवसांत केलेली यात्रा, मग त्याला शास्त्रोक्त यात्रा असे जोडले गेलेले संदर्भ हे आपल्या परिचयाचे असतात. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश. विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. त्याचबरोबर विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्याजोगे आहेत. त्यांच्याशीसुद्धा विविध कथा, दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत. काही खास वैशिष्टय़पूर्ण मूर्ती तिथे पाहायला मिळतात. मुद्दाम वेळ काढून या गणपतींचे, त्या रम्य परिसराचे दर्शन घ्यावे. तिथल्या अष्टविनायकांचे दर्शन अमुक एका क्रमाने घ्यावे, असे काही संकेत आढळत नाहीत; परंतु शक्यतो नागपूरच्या टेकडी गणपतीपासून या अष्टविनायकांच्या दर्शनाला सुरुवात करतात. नागपूर मध्यवर्ती ठेवून या सर्व ठिकाणी आपल्या सोयीनुसार यात्रा करावी. विदर्भाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्याचा प्रत्यय ठायी ठायी आपल्याला येतोच…या विदर्भातील अष्टविनायकांची धावती भेट.
अठरा हातांचा गणपती-रामटेक
विदर्भाचे भूषण रामटेक हे श्रद्धास्थान. त्या रामक्षेत्री सुंदर अठराभुजा गजानन असून पंचफण्यांचा शिरावर नाग सावली करीत असे. कंठभूषण नागाचे, नागपट्टीही कटीचे. विदर्भातील अष्टविनायकांपकी एक असलेल्या रामटेकच्या अष्टादशभुज गणपतीचे वर्णन हे अशा पद्धतीने केलेले आहे. मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थानी प्रसिद्ध आहे. याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. वनवासात असताना रामांचा मुक्काम या ठिकाणी होता असे समजले जाते. त्याचसोबत वाकाटक या बलाढय़ राजवंशाची राजधानी असलेल्या नंदिवर्धन या नगराजवळच हे ठिकाण आहे. कविकुलगुरू कालिदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘मेघदूत’ या काव्याची रचना याच रामटेक इथे केली असे समजले जाते. रामटेक या ठिकाणी आल्यावर कोणीही व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जाते. सापुतारा पर्वतरांगेवर वसलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. वळणावळणाचे रस्ते, डोंगरावरून वाहणारे निर्झर आणि गर्द झाडी यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. वाकाटक, परमार, यादव, भोसले या राजवटींनी या ठिकाणी विविध मंदिरे बांधली. विदर्भातील अष्टविनायकातील एक स्थान यातलेच एक आहे आणि ते म्हणजे अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तीनही गाभाऱ्यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीíतमुखे कोरलेली दिसतात.
नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर िखडशी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते. गणेश मंदिरासमोरच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे.
सिद्धिविनायक एकचक्रा
रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा, दंतकथा आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर वध्र्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.
एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते.
भृशुंड गणपती – मेंढा भंडारा</strong>
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा गणपती वसलेला आहे. भंडारा या जिल्हय़ाच्या ठिकाणाचे एक उपनगर असलेला हा भाग. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले. मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. इथेच एक शिविपडी असून त्याला जागृतेश्वर असे म्हणतात. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शिवाय परिसरात अनेक समाध्या दिसतात.
शमी विघ्नेश -आदासा
नागपूर-िछदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून ४ कि.मी.वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात गणेशाची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडते. मूर्तीवर शेंदुराचे लेपन मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. परंतु ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंदिर व्यवस्थापनाने अतिशय नीटनेटकी अशी इथली व्यवस्था केलेली दिसते. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, पूजा-प्रसादाची वेगळी व्यवस्था, नारळ फोडण्यासाठीचे यंत्र अशा अद्ययावत सोयी भक्तांसाठी इथे केलेल्या आढळतात.
याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र. या ठिकाणाची दुसरी कथा अशी की वालीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याने शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर वामनाने वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात असे मानले जाते.
चिंतामणी गणेश -कळंब
भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब या गावी. प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे कळंब होय. इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर चíचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.
जवळच असलेल्या एका छोटय़ा गाभाऱ्यात शिविलग प्रस्थापित केलेले आहे. तसेच वरच्या पातळीत काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. एका खांबावर चारही बाजूंनी गणेश प्रतिमांचे अंकन केलेले पाहायला मिळते. मंदिरासमोर उभारलेल्या ध्वजस्तंभाचा हा अवशेष असल्याचे जाणवते. कळंब गावचे प्राचीन नाव कदंबसारक किंवा कदंबगिरिग्राम असल्याचे उल्लेख वाकाटक नृपती प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटात आलेले आहेत. कदंब ऋषींचा सुद्धा या स्थानाशी संबंध जोडला जातो.
सर्वतोभद्र गणपती – पौनी
भंडारा जिल्हय़ात, वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पौनी गावात असलेला हा गणपती, म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.
पौनी गावाभोवती तटबंदी बांधलेली दिसते. परिसरातील इतर गावांसाठीची एक महत्त्वाची व्यापारी पेठ, असे या गावचे महत्त्व आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात एक छोटेखानी मंदिर असून त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली दिसते. मंदिराच्या समोर एक गरुडखांब आहे. बांधकामात कोकणातल्यासारखे इथे चिरे वापरलेले दिसतात. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरिस्वामी जोशी यांनी बांधल्याचे सांगतात. या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढय़ांपासून भट कुटुंबाकडे आहे.
वरदविनायक- टेकडी गणपती नागपूर</strong>
विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान. िपपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.
सुरुवातीला इथे अगदी साधेसुधे मंदिर होते. बुटकी िभत आणि चार खांबांवर उभारलेले छप्पर असे याचे स्वरूप होते. परंतु आता हे एक भव्य देवस्थान झालेले आहे. मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. सभोवती रेिलग बसवलेले आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. मोठे मंदिर, आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांसाठी पाìकग असे सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील िभतीला लागून एक शिविपडी आहे. या शिविपडीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शिविलगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.
मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. पहाटे साडेचारपासून विविध पूजाविधी इथे सुरू होतात. मंगळवार आणि शनिवार हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचे दिवस समजले जातात. या दोन दिवशी इथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, िपपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. त्यामुळे इथे विविध जातींचे पक्षिगण पाहायला मिळतात. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.
वरदविनायक गौराळा-भद्रावती
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती म्हणजे भांदक या ठिकाणी विदर्भातल्या अष्टविनायकांपकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. हे मंदिर असलेली टेकडी पूर्वी गायींना चरण्यासाठी राखीव होती म्हणून या ठिकाणाला गौराळा असे नाव पडले. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. तत्कालीन स्थापत्याचे जे काही अवशेष आज पाहायला मिळतात त्यात या ठिकाणाचा समावेश होतो. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. याच टेकडीच्या मागच्या अंगाला एक गुहा खोदलेली असून त्यात काही सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. त्यात गणपती, शेषशायी विष्णू, त्रिविक्रम या मूर्ती आहेतच, परंतु तिथेच दोन मीटर उंचीची केवल नरसिंहाची सुंदर मूर्ती कोरलेली दिसते. ही मूर्ती पाहून रामटेक इथल्या नरसिंहाच्या मूर्तीची आठवण होते.
गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.
(सौजन्य : लोकप्रभा)