– शमिका वृषाली
response.lokprabha@expressindia.com
गणेशाची रूपे त्या त्या धर्ममतानुसार बदलतात. असे असले तरी त्याच्या बास्वरूपातील साधम्र्य वाखाणण्याजोगे आहे. यासारखीच आगळी वेगळी रूपे आपल्याला सापडतात ती जैन धर्मात..
प्राचीन भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहांच्या संगमातून तयार झालेला सागरच आहे. ज्याच्या खोल तळाशी अनेक परंपरांचा रत्नसाठा आजही जगासाठी अनभिज्ञ स्वरूपात आहे. याच रत्नसाठय़ातील एक परंपरा म्हणजे प्राचीन भारताच्या भूमीवर जन्माला आलेले विविध धार्मिक तत्त्वज्ञान. एखाद्या घराच्या अंगणात अनेक रंगाची, मनमोहक सुवासाची फुले उमलावी आणि त्याच्या दरवळाने संपूर्ण परिसर प्रफुल्लित व्हावा त्याचप्रमाणे, या धार्मिक तत्त्वज्ञान परंपरेने या देशाच्या संस्कृतीला आणि इतिहासाला बौद्धिक ज्ञानाच्या व सात्त्विक परंपरांच्या बळावर चतन्य बहाल केले आहे. या धार्मिक संकल्पनांची पकड भारतीय जनमानसावर आहे. याचेच प्रतििबब आपल्याला देवी-देवतांची जडणघडण, सण-समारंभातील पद्धती, पूजेअच्रेतील विविधता यात आढळून येते. याच परंपरांच्या छत्रछायेखाली, भाव तसा देव या उक्तीला अनुसरून आराध्य देवतांची विविध रूपे येथे विकसित झालेली दिसतात. विद्य्ोची बुद्धीदाता देवता श्री गणेश हादेखील यास अपवाद नाही.
प्राचीन काळापासून श्री गणेश अनेक रूपांमध्ये आपल्याला दिसतो. कधी तो वैदिक परंपरेतील ब्रह्मणस्पती असतो तर कधी विघ्नकर्ता स्वरूपातील यक्ष असतो. या श्री गणेशाच्या उत्क्रांतीची पाळेमुळे कितीही अद्भुतरम्य असली तरी त्याच्या प्रगत स्वरूपाचा प्रवासदेखील तितकाच रोचक आहे. िहदू धर्मातील विघ्नहर्ता गणेश हा बौद्ध धर्मात विघ्नकर्ता विनायक म्हणून येतो. गणेशाची ही रूपे त्या त्या धर्ममतानुसार बदलतात. असे असले तरी त्याच्या बास्वरूपातील साधम्र्य वाखाणण्याजोगे आहे. यासारखीच आगळी वेगळी रूपे आपल्याला सापडतात ती जैन धर्मात.
वेदप्रामाण्यावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक तत्त्वज्ञानांच्या यादीत जैनतत्त्वज्ञानाची गणना केली जाते. जैन मत हे ‘कर्तुमकर्तुम् न्यथाकर्तुम्’ सामर्थ्यांवर म्हणजेच सृष्टी ईश्वरनिर्मित आहे, यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. ‘जिनां’चे अनुयायी ते, म्हणजेच जैन ‘जिनप्रतिपादित धर्म तो जैन धर्म’ असे मानतात. ‘जिन’, हेच र्तीथकर, केवली, अर्हत, अरिहंत या नावांनी प्रसिद्ध आहेत. ‘जिन’ हे ईश्वराचे अवतार नसून स्वतच्या तपश्चय्रेने क्रामक्रोधादी विकारावर विजय मिळवून कर्ममलाला बाजूला सारून आत्म्याला निर्मळ करून घेणारे लोकोत्तर पुरुष होते. हेच दिव्य पुरुष या धर्माचे आधारस्तंभ आहेत. आदिनाथ किंवा ऋषभनाथ हे प्रथम र्तीथकर असून महावीर हे चोविसावे आणि अखेरचे र्तीथकर होऊन गेले.
सुरुवातीच्या काळात जैन धर्मात मूर्तीपूजेला फारसे प्राधान्य दिलेले आढळत नाही. तरीही कालपरत्वे जैन प्रतिमांचा प्रसारा वाढला आणि प्राचीन भारतीय कला अभ्यास हा या प्रतिमांच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण ठरू लागला. जैन गणेशदेखील याच जैन प्रतिमांच्या पसाऱ्यातील एक अविभाज्य घटक आहे. वास्तविक पाहता गणेश किंवा गणपती ही िहदू धर्मातील देवता आहे. तिचा जैन धर्मातील प्रवास तुलनेने उशिराचा आहे. म्हणूनच जैन धर्मातील गणेशाची उत्पत्ती व विकास जाणून घेण्यासाठी जैन धर्मातील मूर्ती संकल्पनेचा विकास जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
जैन विद्वानांच्या मते जैन कलेचा आरंभ हा सिंधू सभ्यतेपासून झाला. परंतु हे मत सर्वमान्य नाही. जैन वाङ्मयीन उल्लेखांच्या आधारावर महावीरांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्याच जीवनात सुरू झाले होते. म्हणूनच महावीरांची ती प्रतिमा ‘जिवंतस्वामी’ प्रतिमा म्हणून ओळखली गेली. परंतु जैन र्तीथकराची सर्वात प्राचीन प्रतिमा ही बिहार येथील लोहानीपूर येथे सापडली. अभ्यासकांच्या मते हे शिल्प मौर्यकालीन आहे. त्या नंतर मात्र कुशाण काळापासून जैन शिल्पे मोठय़ा प्रमाणात सापडण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात जैन मूर्ती या कमी अलंकरण असलेल्या, केवळ र्तीथकरच असलेल्या स्वरूपाच्या होत्या, परंतु गुप्त काळापासून र्तीथकरांसोबत परिवार देवतांचीही वाढ झालेली दिसते. कालांतराने यक्ष, शासनदेवी हे र्तीथकरांच्या शिल्पाचे अविभाज्य भाग झालेले दिसतात. जैन धर्मात आढळून येणारी दैवतपरंपरा ही श्वेतांबर व दिगंबर या पंथानुसार बदलते. जैन मूर्ती संघात कुशाण काळापासून काही िहदू देवतांच्या प्रतिमाही समाविष्ट झालेल्या दिसतात. कुशाणकालीन सरस्वती, पद्मा, गजलक्ष्मी ही विशेष उल्लेखनीय उदाहरणे आहेत. जैन मतात र्तीथकर हे अग्रणी असल्याने इतर देवता या दुय्यम स्थानी दाखविल्या जातात. त्यामुळे जैन धर्मातील गणेशाचे स्थान हे िहदू धर्माप्रमाणे अग्रणी नसून दुय्यम आढळते.
र्तीथकरांच्या आजूबाजूला बलराम व वासुदेव कृष्ण, गणेश, नवग्रह याशिवाय शासन देवतांमध्ये अंबिका, गोमुख यक्ष, क्षेत्रपाल, यक्षब्रह्मा आढळून येतात. या प्रकारच्या अंकानात र्तीथकरांचे श्रेष्ठत्व स्थापन करण्यासाठी इतरांना त्यांचे उपासक, शासन, देव किंवा यक्ष दाखविणे जैन मतानुसार क्रमप्राप्त होते. अशाच स्वरूपाच्या प्राथमिक प्रतिमा बौद्ध धर्मातही आढळतात. परंतु बौद्धांच्या वज्रयानी तांत्रिक प्रतिमांमध्ये अपराजिता, पर्णशबरी, विघ्नांतक या वज्रयानी देवता गणपतीला पायाखाली दाबताना, तुडवताना, त्याच्या अंगावर नाचताना दाखविल्या आहेत. या मूर्तीमध्ये दिसणाऱ्या दुर्भावना, तिरस्कार, अपमान हे भाव जैन धर्मातील शिल्पांमध्ये आढळून येत नाहीत. जैन धर्मात गणपती हा विघ्नहर्ता म्हणूनच पूजला जातो.
मुळातच जैन हा बहुसंख्य व्यापारी असलेला समाज आहे. त्यामुळे जैन धर्मातील गणेशाचे आताचे स्वरूप हे कुबेराशी साम्य सांगणारे आहे. म्हणूनच जैन धर्मात गणेशाचा संबंध व्यापाराच्या समृद्धीसाठी जोडला जातो. श्वेतांबर जैन पंथीयांनी गणेश व इतर िहदू देवतांना त्यांच्या पंथात समाविष्ट करून घेतले. दिगंबर साहित्यात मात्र गणेशाशी संबंधित संदर्भ सापडत नाहीत. आजवर गणेशाच्या सापडलेल्या बहुतांश मूर्ती या श्वेतांबर पंथीयांच्या आहेत. यास अपवाद म्हणजे ओदिशातील उदयगिरी व खंडगिरी या दिगंबर पंथीय लेणींतील गणेश शिल्प.
प्राचीन जैन साहित्यात गाणपत्य संप्रदायाविषयी संदर्भ सापडत नाहीत. परंतु गणेशाचा सर्वात प्राचीन उल्लेख बाराव्या शतकातील आहे. ‘अभिधान चिंतामणी’ या हेमचंद्र लिखित जैन ग्रंथात गणेशासाठी हेरंब, गणविघ्नेश, विनायक इत्यादी नावांचे उल्लेख सापडतात व हा गणेश गजमुख असून तुंदिलतनू, लंबोदर, एकदंत, परशुधारी आहे. त्याचे वाहन उंदीर आहे, असे वर्णन साहित्यात आपल्याला सापडते. जैन पंडित वर्धमान सुरी यांच्या इसवी सन १४१२ मध्ये लिहिलेल्या ‘आचार दिनकर’ या ग्रंथात गणेशाचा संदर्भ सापडतो. या ग्रंथातील ‘गणपती प्रतिष्ठा’ या अध्यायात गणेशाचे मूर्तिविधान, गणेश प्रतिष्ठान विधी दिलेले आहे. या ग्रंथानुसार गणेशाला दोन, चार, अठरा किंवा १०८ हात दाखविले जातात. गणेशाच्या अभय व वरद मुद्रेचाही उल्लेख त्यात आहे. त्याच्या हातात असलेल्या आयुधांचेही संदर्भ या ग्रंथात आहेत. प्रत्येक मंगलप्रसंगी देवही गणेशाचे वंदन करतात असा उल्लेख या ग्रंथात सापडतो. याशिवाय जैन साहित्यात गणेशविषयक एक रोचक कथा सापडते. गंधार गौतम किंवा इंद्रभूती गौतम या नावाने प्रसिद्ध असलेला वर्धमान महावीरांचा एक शिष्य होऊन गेला. महावीरांचे शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी गौतम हा महावीरांच्या शिकवणुकीच्या विरोधात होता. महावीरांना ज्ञानप्राप्तीनंतरच्या पहिल्या सभेत त्यांना विरोध करणाऱ्या गौतमाची वाचा बसली, तो एकही शब्द बोलू शकत नव्हता. महावीरांची त्याच्यावर दृष्टी पडताच त्याचा अहंकार गळून पडला व क्षणार्धातच त्याने जैन धार्मिक ग्रंथाचा महत्त्वपूर्ण भाग लिहून पूर्ण केला. हाच गौतम पुढे गणेश म्हणून जैन धर्मात प्रसिद्ध पावला असे मानले जाते. हे साहित्यिक आणि वाङ्मयीन संदर्भ वगळता, गणेशाचे जैन धर्मातील स्वरूप जाणून घेण्यासाठी, जैन कलेतील त्याच्या शिल्पांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
आजतागायत जैन गणेशाच्या जवळपास बारा ते पंधरा शिल्पकृती वेगवेगळ्या स्थळांवर सापडलेल्या आहेत. त्यांचा काळ हा इसवी सनाच्या नवव्या ते बाराव्या शतकातील आहे. सापडलेल्यांपकी बऱ्याचशा शिल्पकृती या पश्चिम भारतातील असून त्यातील सात शिल्पकृती या दगडावर कोरलेल्या आहेत. या शिल्पकृतींमध्ये येणारा गणेश हा संरक्षक, क्षेत्रपाल किंवा यक्ष आहे. या पूर्वीच नमूद केल्याप्रमाणे जैनांचे चोवीस र्तीथकर असून त्याच्यांसोबत यक्ष-यक्षीही येतात. त्या यक्षांमध्ये जैन गणेश पाहायला मिळतो. पाश्र्वनाथ र्तीथकारांचा यक्ष हा गजमुखी असून त्याचे मूíतमंत रूप हे डोक्यावर नागाचा फणा, काळा रंग, चार हात, हातात अनुक्रमे बिल्वफळ, सर्प, मुंगुस दर्शविलेले आहेत तर त्याचे वाहन कासव आहे. तर गोमुख नावाचा आदिनाथांचा यक्ष व पूर्णभद्र नावाचा यक्ष हेदेखील गजमुखच आहेत. पूर्णभद्राचे वाहन घोडा आहे. म्हणूनच जैन गणेशाचे स्थान जीनालयात मुख्य गाभाऱ्यात तर ते प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर, पीठावर किंवा तळघरात सापडते. मुख्य गाभाऱ्यातील गणेशाची गरहजेरी हे त्याचे जैन धर्मातील गौणत्व सिद्ध करते. जैन गणेशाचे सर्वात प्राचीन शिल्प हे मथुरेला सापडते. सध्या ती शिल्पकृती मथुरा पुरातत्त्वीय संग्रहालयात आहे. मुळात मुख्य शिल्पकृती ही अंबिकेची असून शिल्पकृतीच्या उजव्या कोपऱ्यात गणेशाचे अंकन सापडते. या अंकनात गणेश ललितासनात दाखविलेला आहे. दावा पाय दुमडलेला तर उजवा पाय खाली सोडलेला आहे. एक हात अभय मुद्रेत आहे तर दुसऱ्या हातात मोदकपात्र आहे. गणेशाचे द्विभुज असणे हे त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते.
नंतरच्या काळातील जैन गणेशाची दोन महत्त्वाची शिल्पे सापडतात, ती ओदिशातील उदयगिरी आणि खंडगिरी येथील गणेश व नवमुनी लेणींमध्ये. या शिल्पकृती दिगंबरपंथीयांच्या असल्याचे अभ्यासक मानतात. नवमुनी लेणींमधला गणेश हा सात यक्षिणींसोबत दाखविलेला असून तो ललितासनात बसलेला आहे. त्याने जटामुकुट, अक्षमाला, परशु, पुष्प आणि मोदकपात्र धारण केले आहे. तर गणेश लेणींमधला गणपती हा पुष्प, परशु व मोदकपात्र धारण करणारा आहे. मथुरा व ओदीशा येथील गणेश प्रतिमा वगळता जैन गणेशाच्या इतर प्रतिमा या मुख्यत्वे राजस्थान व गुजराथमध्ये सापडलेल्या आहेत. विशेषत गणेशाची ही शिल्पे जैन मंदिरांच्या शिल्पकृतींचा भाग असून स्वतंत्र जैन गणेश मूर्ती सापडलेल्या नाहीत. पश्चिम भारतातील या जैन गणेश शिल्पांचा कालावधी ११व्या ते १४व्या शतकातील आहे. राजस्थानमधील घानेराव, ओसिअन, नारलाई, विमल वासही, आहाड येथील जैन मंदिरातील गणेश शिल्पे ही विशेष महत्त्वाची आहेत. घानेराव येथे महावीर मंदिरात आढळणारे गणेशाचे शिल्प हे एका स्तंभावर गूढ मंडपाच्या जवळ सापडते. येथील गणेश हा ललितासनात असून वरद मुद्रेत आहे. हातात अनुक्रमे परशु, मोदकपात्र, कमळ धारण केलेले आहे. तर ओसिअन येथील महावीर मंदिर परिसरात तीन गणेश शिल्पे आढळतात. येथील गणेश प्रतिमांमध्येही गणेश हा मोदकपात्र, कमळ, परशु, नागपवीत धारी आढळतो तर एका ठिकाणी गणेशाचे वाहन हे हत्ती दृष्टिपथास पडते. नारलाई येथील नेमीनाथ व सुपाश्र्वनाथ मंदिरात दोन गणेश शिल्पे आढळतात. नेमीनाथ देवळातील गणेश हा उंदीर वाहनासकट आणि वरदमुद्रा आणि मोदकपात्र, कमळधारी, चतुर्भुज आहे तर सुपाश्र्वनाथ मंदिर परिसरातील गणेश द्विभुज असून त्याचे वाहन मेंढा आहे. विमल वसही येथील जैन मंदिरात गणेश हा एका ठिकाणी पाश्र्वयक्ष स्वरूपात दिसतो तर दुसऱ्या ठिकाणी जैन देवता महाविद्यागौरीच्या चौकटीवर कोरलेला आहे. या काही मंदिरांशिवायदेखील राजस्थानमधील अनेक जैन मंदिरांवर गणेशदर्शन घडते. राजस्थानशिवाय गुजरात येथील बनासकांठा कुम्भारीया महावीर मंदिरातील गणेश विशेष उल्लेखनीय आहे. येथील गणेश हा चतुर्हस्त, लंबोदर आणि ललितासनात असून मूषक वाहनासोबत मोदकपात्र, करंडकमुकुट, उद्रबंध, नागपवीत धारण करणारा आहे. तर खांबात पाश्र्वनाथ मंदिर हे चिंतामणी मंदिर या नावाने प्रसिद्ध असून येथील गणेशाच्या शिल्पकृतीमुळे त्या मंदिराला चिंतामणी नाव पडले असावे असे अभ्यासक मानतात. एकूणच जैन गणेशाचे स्वरूप हे साधे सोपे आहे. िहदू धर्मातून जैन धर्मात प्रवेश करत असताना जैन धर्मात गणेशाचे मूळ हरवलेले दिसत नाही. अंबिका, महाविद्या गौरी यांच्या सोबतचे त्याचे अस्तित्व हे पार्वतीनंदन गणेशाची तर इंद्रभूती गौतम हा महाभारताचा लेखनिक असलेल्या गणेशाची आठवण करून देतो हे मात्र नक्की!