श्रीगणेशाचे आगमन जवळ आले असून त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध भागातील बाजारपेठांत उत्साहाचे वातावरण आहे. या उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या असून त्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
आठवडाभरावर आलेल्या श्री गणेशाच्या आगमनासाठी मोठय़ा संख्येने पेण (रायगड) जिल्ह्य़ातून आणि मुंबई येथून येणाऱ्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पालघर जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांचे रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. (इको फ्रेंडली) पर्यावरणपूरक, नैसर्गिक सजावटीच्या साहित्याचा वापर करण्याचा अनेक भाविकांचा कल असला तरी प्लास्टिकची फुले, आकर्षक रोषणाई व इतर चायनीज बनावटीच्या वस्तूंची बाजारपेठेत रेलचेल असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखावे तयार करण्याचे काम जोमाने हाती घेतले आहे. पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मंडपांना आकर्षक विद्युत रोषणाईद्वारे सजावट करण्यात येत आहे.
गणेशोत्सवादरम्यान लागणारे मोदक, उकडीचे मोदक, अळुवडय़ा, लाडू, पुरणपोळ्या या पारंपरिक व घरगुती स्वरूपातील खाद्यपदार्थाना विशेष मागणी असल्याने त्याकरिता घरगुती पद्धतीने पदार्थ तयार करणाऱ्या महिला बचत गटांकडे आगाऊ ऑर्डर दिल्या जात आहेत. खव्याच्या वेगवेगळ्या आस्वादांमध्ये मोदक बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत.