यावर्षी गणेश चतुर्थी निमित्ताने मी माझ्या गावी गोव्याला आले आहे. यानिमित्ताने मला माझ्या परिवारासोबत वेळ घालवता आला याचा मला खूप आनंद आहे, असे अभिनेत्री गिरीजा प्रभू सांगते. गिरीजा मूळची गोव्याची असल्यामुळे तिच्या गावी दरवर्षी दीड दिवसाचा गणपती बसतो. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करत असल्यामुळे गावी गणपतीसाठी फार कमी वेळा जाता आले, असे देखील गिरिजाने सांगितले,
हेही वाचा >>> गणरायावरचा विश्वास महत्त्वाचा – ज्ञानदा रामतीर्थकर
सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सुरु असलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गौरी ही मुख्य भूमिका गिरीजा प्रभू साकारते आहे. गिरीजा सांगते, ‘‘मी लहान असताना गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये भाग घ्यायचे त्यामुळे गणेश चतुर्थीमधील स्पर्धा, धमाल आणि गजबजलेलं वातावरण मला फार आवडतं. वेळात वेळ काढून आम्ही गणरायाच्या आगमनासाठी गावी जायचो, गावी सगळे नातेवाईक एकत्र आल्यावर आणखी उत्साह वाढतो. गणपतीचे आगमन हे फार मोठे निमित्त आहे. ज्यामुळे वेळात वेळ काढून आमचा संपूर्ण परिवार एकत्र येतो. कामाच्या दगदगीमधून हे दोन दिवस आम्हाला एकत्र साजरे करता येतात.’’
हेही वाचा >>> चराचरांत गणपती असतो – शशांक केतकर
मालिकेच्या सेटवर देखील खूप धम्माल सुरू असते, असं ती सांगते. आमच्या संपूर्ण टीममध्ये गणपतीच्या निमित्त कोणाच्या घरी कधी मोदक खायला जायचे याची चर्चा सुरू असते. माझे असे अनेक सहकलाकार आहेत जे सेटवर जितके उत्साही असतात तेवढय़ाच उत्साहात घरी जाऊन गणपती निमित्ताने घरातील काम करतात. त्यांना बघून मला देखील माझ्या घरची आठवण येते, असं तिने सांगितलं. माझ्यासाठी गणपती म्हणजे एक आशेचा किरण आहे. माझी त्याच्यावर फार श्रद्धा आहे. मला नेहमी गणपतीमुळे सकारात्मकता, विश्वास आणि सगळं काही चांगलं होण्याची आशा मिळते, असं गिरीजा आवर्जून सांगते.