या वर्षी गणपतीसाठी चक्क पाच दिवसांची सुट्टी मिळाल्यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर खूप खूश आहे. ‘गणपतीचे पाचही दिवस मी पुण्याला माझ्या घरी आहे. यंदा मला गणपतीची आरास करता आली नाही. दरवर्षी मी आणि माझा भाऊ गणपतीसाठी खास तयारी करतो. यंदा तो अमेरिकेला असल्यामुळे गणपतीसाठी घरी येऊ शकणार नाही, पण आम्ही आधीच त्याला गणपतीनिमित्त खूप सारा खाऊ पाठवून दिला आहे’ असे तिने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल

गणपतीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, ‘लहानपणी आमच्या घरच्या गणपतीचे जवळच्याच एका विहिरीत विसर्जन करायचो. ती विहीर खूप खोल असल्यामुळे आम्हाला त्यात उतरता येणे शक्य नव्हते, वरून गणेश मूर्ती थेट सोडावी लागायची. का कोण जाणे मला ते पाहून फार भरून यायचे. मी खूप वेळ का विसर्जन केले गणपतीचे म्हणून रडत बसायचे. गणेशोत्सवाच्या किती आठवणी सांगू आणि किती नको असे होते. एका वर्षी मी गणेशोत्सवादरम्यान घरी असताना पाच-सहा पुरणपोळय़ा एकाच वेळी खाल्ल्या होत्या. त्यानंतर मी पाच तास गाढ झोपले होते. त्यावरून अजूनही माझी घरी चेष्टा केली जाते. दरवर्षी आम्ही घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर विभागले जातो. मी माझ्या मित्र, मैत्रिणींना भेटते, माझा भाऊ त्याच्या मित्र, मैत्रिणींना भेटतो. माझे आईवडील नातेवाईकांना भेटतात आणि नंतर आम्ही एकत्र मिळून पुण्यातील गणपती बघायला जातो, ’असे जुन्या आठवणींना उजाळात देताना ज्ञानदाने सांगितले.

हेही वाचा >>> चराचरांत गणपती असतो – शशांक केतकर

ज्ञानदा सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अपूर्वा ही मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेत तिने चॉकलेटचा गणपती घडवला आहे. ‘मी अप्पू हे पात्र साकारताना अनेकदा असे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. ज्ञानदा म्हणून मी कधीच चॉकलेटचा गणपती किंवा गोडाचा गणपती केला नव्हता, पण अप्पूच्या निमित्ताने हा अनुभव मला घेता आला’असा सेटवरच्या गणपतीचा अनुभव तिने सांगितला. ‘आपण जसजसे मोठे होत जातो तशा आपल्या इच्छा देखील वाढत जातात, पण केवळ मागणे मागण्यापेक्षा त्याचे आभार मानणे जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. जे घडते ते चांगल्यासाठी असते, गणपती आपल्यासोबत नेहमी आहे हा विश्वास आपल्या मनात असतो. त्यामुळे आपण शांतपणे आपले काम करत राहावे’ असा सल्ला ज्ञानदाने दिला.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati bappa at actress dnyanada ramtirthkar home zws
Show comments