Ganpati bappa decoration based in Gangaghat theme| Paulcha ladka Mumbai: ७ सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि देशासह परदेशात ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच जयघोष सुरू झाला. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. गेल्या महिनाभरापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेशोत्सवात मूर्तीसह आणखी एक आकर्षणाचा भाग म्हणजे डेकोरेशन. आजकाल थीमनुसार डेकोरेशन करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. गणेशभक्तांना यातून चांगला संदेश पोहोचेल हे मुख्यत: या डेकोरेशनचं तात्पर्य असतं. गेल्या अनेक वर्षांत मुंबई थीम डेकोरेशन, लालबाग वस्तीतलं डेकोरेशन असे अनेक थीमवर आधारित डेकोरेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या वर्षीदेखील सामाजिक संदेश घेऊन आलेलं असंच एक डेकोरेशन चर्चेत आहे, जे इंटरनेटवर तुफान व्हायरल होतंय.

मुंबईतील कलाकारने साकारलं मिनी गंगाघाट

गणेशोत्सवातील या डेकोरेशनचा व्हायरल व्हिडीओ मुंबईत सायन येथील असून ‘पॉलचा लाडका’ या बाप्पाचे डेकोरेशन या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. पॉलचा लाडका या बाप्पासाठी खास ‘गंगाघाट’ थीमवर आधारित डेकोरेशन करण्यात आलं आहे.

गंगाघाट हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि कानपूर शहरापासून फक्त १० किमी अंतरावर आहे. येथे गंगेला खूप महत्त्व आहे. वाराणसीमध्ये गंगेची माता गंगा म्हणून पूजा केली जाते आणि लोक तिच्याकडे मोठ्या श्रद्धेने पाहतात.

हेही वाचा… खांद्यावर बाप्पाची मूर्ती ठेवत चालत्या गाडीवर उभं राहून तरुणानं केला स्टंट, बाप्पाचं आगळं वेगळं आगमन दाखवणारा VIDEO VIRAL

शीव (Sion) येथील प्रतीक्षा नगर येथे एका घरी हा सुंदर देखावा साकारला आहे. या व्हिडीओमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती गंगा नदीकाठी शहराच्या मधोमध स्थापित केलेली दिसतेय. नदीतील होडीमध्ये बाप्पाचं लाडकं वाहन मुशक बसलेला दिसतोय. या होडीला दोर बांधून त्याचं एक टोक बाप्पाने एका हाताने धरलं आहे. ‘गंगाघाट’ येथील सगळ्या वास्तूंचं मिनिएचर तयार करून ही थीम डेकोरेट केली आहे. ही थीम मुख्यत: प्रदूषणावर आधारित आहे.

हा व्हिडीओ @paulchaladka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आओ मिलकर ये कसम खाएँ, प्रदूषण को हम दूर भगाएँ, संदेश ये हम सब तक पहुँचाएँ, प्रदूषण मुक्त पर्यावरण बनाएँ”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

आताच्या घडीला गंगा ही जगातील सर्वात प्रदूषित नदी मानली जाते, म्हणून या मातेसमान नदीत प्रदूषण करू नये हा सामाजिक संदेश या थीममधून देण्यात आला आहे. “No pollution is the only solution” असं कॅप्शनही या व्हिडीओबरोबर शेअर केलेल्या फोटोंना देण्यात आलं आहे.

हेही वाचा… Ganesh Chaturthi: हत्तीनं बाप्पाच्या गळ्यात हार घालून केलं नमन, गणरायाच्या भक्ताने असं केलं बाप्पाचं आगमन, VIRAL VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, फ्रॅंकलिन पॉल या कलाकाराने हा देखावा केला असून दरवर्षी सामाजिक संदेश देणारे असेच देखावे तो आपल्या कलेतून सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. याआधी कलाकाराने, कर्करोग रुग्णांवर आधारीत टाटा स्मारक रुग्णालयाचा देखावा, तर अतिवृष्टी आणि पाणी जमाव ह्या विषयावर देखावा, तसेच केदारनाथ येथील मिनिएचर असे अनेक सुंदर देखावे साकारले आहेत.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati bappa decoration based in gangaghat theme viral video of paulcha ladka ganesha in sion mumbai dvr