Gauri Ganpati Pujan 2023 सोलापूर : अलिकडे देशात जाती-धर्माच्या नावाखाली संकुचित राजकारणाला खतपाणी घालून धार्मिक ध्रुवीकरण वाढविण्याचे प्रयत्न अगदी गावपातळीवर होत असताना अद्यापि विविध सणासुदीत जाती-धर्मातील एकोपा, बंधुभाव आणि गाववाडा संस्कृती टिकून असल्याचे पाहायला मिळते. त्याचे साक्षित्व सोलापूर जिल्ह्यात अनेक खेडेगावांमध्ये मुस्लीम कुटुंबीयांच्या घरी पूजल्या जाणा-या गौरी अर्थात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिसून येते.
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील देगाव तांडा, कुमठे असो वा आसपासच्या भागातील मार्डी, बार्शी तालुक्यातील वैरागजवळील साखरेवाडी, मालवंडी, तडवळे, अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड यांसह जिल्ह्यात बहुसंख्य गावांमध्ये मुस्लीक कुटुंबीयांच्या घरी गौरी गणपतीच्या उत्सवात लक्ष्मी मूर्तीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते. श्रध्दा ही माणसाला जाती-धर्माच्या पलिकडे घेऊन जाते. हेच चित्र बार्शी तालुक्यातील तडवळे येथे शेख-कोतवाल कुटुंबीयांच्या घरी पाहायला मिळते.हे कुटुंब तब्बल शंभार वर्षापासून हिंदू संस्कृतीप्रमाणे गौरीची मनोभावे पूजा करीत आहे.
हेही वाचा >>>“जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत…”, धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
अल्लाउद्दीन सुलेमान शेख-कोतवाल यांच्या घरी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन करण्यात आले. सोनपावलांनी लाडक्या गौराईचे आगमन झाले. अल्लाऊद्दीन यांचे आजोबा तब्बूलाल कोतवाल रामभक्तीची वचने, अभंग म्हणून दिवसाची सुरुवात करीत असत. पुढे सुलेमान शेख-कोतवाल यांनी परंपरा कायम ठेवत घटस्थापना, दीपावली, अल्लाऊद्दीन यांच्यासह त्यांच्या पत्नी बिसमिल्ला, मुले अंजूम, परवीन, कलिम, खुशी यांचा गौरी पूजनात सहभाग असतो. मूर्तीची आरास, खेळणी, रोषणाई आदी कामे रात्रभर जागून केली जातात. साखरेवाडीत उस्मान माणिक शेख यांच्या पूर्वजांना पन्नास वर्षांपूर्वी ओढ्यात गौरीचे मुखवटे सापडले. हे मुखवटे घरी आणून दरवर्षी गौरीचे पूजन केले जाते. मालवंडी गावचे ग्रामदैवत शेखागौरी आहे. या गावातील याकूब मुजावर आणि रफिक आतार यांच्या घरी भक्तिभावाने गौराईचे पूजन होऊन नैवेद्य दाखविले जाते.
हेही वाचा >>>सांगली : ऊस निर्यात बंदी मागे
अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड गावात अयुब बाबूलाल पठाण यांच्या घरी पूर्वापार परंपरेने गौरीपूजन करण्यात संपूर्ण पठाण कुटुंबीय तल्लीन होते. सायंकाळी आरती होऊन नैवेद्य दाखविण्याबरोबरच पाहुण्यांसह गावातील महिलांना अगत्याने आमंत्रित केले जाते. शहरानजीक देगाव तांड्यावर राहणारे नजीर सय्यद यांच्या घरीही गौरी प्रतिष्ठापनेची परंपरा कायम आहे.