अलिबाग – लाडक्या गणेशाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी शनिवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजत गाजत,उत्साहात विसर्जन करण्यात आले.
दुपारी चार वाजल्यानंतर ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूका विसर्जनस्थळी निघाल्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे आर्जव करीत ढोलतांशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणूकांमध्ये गुलालाची उधळण होत होती. ढोल-ताशा, नाशिकबाजा, बेन्जोच्या तालावर थिरकत मिरवणुका पुढे सरकत होत्या. दक्षिण रायगडमधील महाड,श्रीवर्धन , माणगाव, म्हसळा, मुरूड ,रोहे तालुक्यांमध्ये मिरवणूकांमध्ये पारंपारिक सनई खालूबाजा आणि त्यावर लेझीम घेवून नाचणारे गणेशभक्त आजही पहायला मिळत होते. तर काही गणेशभक्तांनी चक्क टाळमृदुंगाच्या साथीने भजन करीत मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू होत्या. महिलाही मोठ्या संख्येने या मिरवणूकांमध्ये सहभागी झाल्या होत्या ,फेर धरून नाचत होत्या.
हेही वाचा >>>शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या…
अलिबाग नगरपरिषदेतर्फे समुद्रकिनारी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी खास स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. तेथून गणेशभक्तांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात होत्या . निर्माल्य गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अलिबागकरांनी समुद्र किनारी मोठी गर्दी केली होती. विसर्जनस्थळी होणार्या सामुहिक आरत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाला निरोप देताना वातावरण भारावून गेले होते. ग्रामीण भागात तळे, नदी, ओढे यामध्ये तर शहरी भागात समुद्र तलावांमध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.रायगड जिल्ह्यात ५८ हजार ६६६ घरगुती, तर ७२ सार्वजनिक गणपतीसह १४ हजार ४५५ गौरींचे विसर्जन करण्यात आले .विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग शहरातील वाहतूक व्यवस्थेत थोडा बदल करण्यात आला होता.