विदर्भ गणेश दर्शन
नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे.  या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे दिडशे वर्षांपूर्वी झाली. दरगणेश चतूर्थीपासून अनंत चर्तुदशी पर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणूकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची १५० वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे.
या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगांवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व छत्तीसगडवरून मोठया प्रमाणावर भाविक भक्त येतात. शिव व पेशवेकाळात सुमारे १५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव व रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सहा फूट उंचीची ही मुर्ती अतिशय आकर्षक लोभस व देखणी आहे. संपूर्ण लाकडी शिल्पातून ही मूर्ती साकार झाली आहे. काष्ठशिल्पाचा तो पुरातन वैभवशाली तसेच प्रेरणादायी ठेवा आहे. यामूर्तीची प्रतिष्ठापना आचारी अय्या लोकांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर या मंदिराकडे खामगांवकरांनी विशेष लक्ष दिले. सन १९५० नंतर खामगांवचे अडते मेसर्स जयनारायण नंदलाल व इतर धान्य व कापूस खरेदीदारांनी नोंदणी केली.  लाकडी गणपती श्रीगणेश मंदिराचे त्यावेळी विश्वस्त म्हणून माताशरण दुबे, लक्ष्मण हिवरकर, त्र्यंबकलाल पुरवार, दत्तात्रय वरणगांवकर, एकनाथ जयराम, भिकाजी निंबाजी व गंगाधर पिवळटकर यांनी काम पाहिले.  यानंतर सन १९९५ साली धर्मदाय आयुक्तांनी आर. बी. अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात हे मंदिर दिले. त्यानंतर सन १९९६-९७ मध्ये मिंदराचा जिर्णोध्दार करून नवीन वास्तू बांधण्यात आली. मंदिराची वास्तू आधूनिक मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे.
खामगांवात विसर्जन मिरवणूकीत लाकडी गणपतीला प्रथम मानाचे स्थान आहे. जोपर्यंत लाकडी गणपतीची मिरवणूक फरशीवर येत नाही तोपर्यंत इतर मंडळाच्या मिरवणूकीस सुरूवात होत नाही.  ही परंपरा खामगांवात तंतोतंत पाळली जाते. लाकडी गणपतीची मिरवणूक न निघाल्यास इतरही मिरवणूका निघत नाहीत. अलिकडे मंदिर विश्वस्तांनी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर , अन्नदान , सांस्कृतिक कार्यक्रम आदिंचा समावेश आहे. खामगांवचा लाकडी गणपती महाराष्ट्रातील एकमेव असल्याने व त्याला दीड शतकाची परंपरा असल्याने भाविकांची या गणपतीवर प्रचंड श्रध्दा आहे. 

Story img Loader