Jyeshtha Gauri Naivedya: महाराष्ट्रभर गणपतीची धामधूम सुरु असताना आज घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. पण महाराष्ट्रातील काही भागात विशेषतः कोकणात गौरीला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. मुळात सणासुदीच्या दिवशी मांसाहार वर्ज्य असताना स्वतः देवीलाच असा नैवेद्य का दाखवला जातो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, चला तर मग आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौराईला ठिकठिकाणी भाजी-भाकरीचा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य, फराळाचा नैवेद्य जसा दाखवतात तसाच कोकणात गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे असा बेत करायची पद्धत आहे. या नैवेद्यात चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे व मासे सुद्धा आवर्जून समाविष्ट केले जातात . इतकेच नव्हे तर काही घरात वाईन सुद्धा नैवेद्यात ठेवण्याची प्रथा आहे. हे सर्व करत असताना गौरी आणि गणपतीमध्ये एक पडदा लावून विभाजन केले जाते. कारण गणपतीसमोर मांसाहाराचा नैवेद्य दाखवत नाहीत.

गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवायचा?

हिंदू पुराणानुसार, जेव्हा गौरीचे म्हणजेच माता पार्वतीचे महादेवांशी लग्न होते आणि लग्नानंतर ती माहेरपणाला जात असते तेव्हा शंकर गौरीच्या रक्षणासाठी काही भूतगण सोबत धाडतात. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीचे खूप लाड केले जातात, तिच्यासाठी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र या गडबडीत गौरीच्या माहेरातून सोबत आलेल्या भूतगणांकडे दुर्लक्ष होते. स्मशानात राहणाऱ्या त्या भूतगणांना मांस खायची सवय होती, स्वतः मांसाहार न करत नसतानाही आपल्या पाहुण्यासाठी गौरीने खास मांसाहाराचा बेत सुद्धा करायला लावला आणि या सर्व भूतगणांनी जेवण केल्यावरच तिने अन्न ग्रहण केले.

(तुमच्या घरचा बाप्पा लोकसत्तावर पोस्ट करण्यासाठी ‘इथे’ करा क्लिक)

यानुसार जेव्हा गणपतीच्या दिवसात ज्येष्ठा गौरी घरी येतात तेव्हा भूतगण सुद्धा तिच्या रक्षणासाठी आलेले असतात असे मानले जाते. या भूतगणांच्या आनंदासाठी मांसाहाराचा बेत केला जातो.यानुसार जरी नैवेद्य गौरीसमोर ठेवण्यात येत असला तरी तो देवी पार्वतीला नसून सोबत आलेल्या भूतगणांसाठी असतो.

यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. ४ सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाणार आहे.

(टीप- सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyeshtha gauri pujan 2022 why do we offer chicken mutton nonveg feast to goddess in some parts of maharashtra read story svs
Show comments