Lalbaugcha Raja First Look : जगप्रसिद्ध असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाचं पहिली झलक समोर आली आहे. लालबागच्या राजाचं यंदाचं ९१ वं वर्ष असून डोळे दिपवणारे असे रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. बाप्पाची सोज्वळ, निरागस मूर्ती असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे.

नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी भारतभरातून भाविक येत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भलीमोठी रांग असते. त्यामुळे अनेकजण पहिली झलक पाहण्यासाठी आतूर असतात. आजच्या कार्यक्रमात मुंबईभरातून अनेक भाविक लालबाग परिसरात दाखल झाले होते.

लालबागच्या राजाच्या मूर्तीचं यंदाचं वैशिष्ट्य काय

यंदा लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं आहे. तर, काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागिरांना दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

हेही वाचा >> दिव्यांग भक्ताने पायाने रेखाटलं ‘लालबागच्या राजा’चं चित्र, VIDEO पाहून कराल कौतुक

अनंत अंबानी विश्वस्तपदी

या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकारिणी मंडळात अनंत अंबानी यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला अशी माहिती मिळते आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली योगदानाची दखल घेऊन लालबाग राजा (Lalbaugcha Raja) मंडळाने हा निर्णय घेतला ही माहितीही समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांत लालबागच्या राजाच्या प्रसिद्धीत उल्लेखनीय भर पडली आहे. आणि परिणामी मंडळाची प्रतिष्ठा देखील वाढली आहे. अशा प्रतिष्ठित मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून निवड होणं, हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. अनंत अंबानी यांच्या नियुक्तीमुळे मंडळाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणखी वाढण्यास मदत होईल, असं बोललं जात आहे.