अलिबाग – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रायगड पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी दरम्यान दहा प्रवासी सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. तर वाहतूक नियमानासाठी महामार्गावर ४० मोटरसायकल पथके तैनात ठेवली जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
गणेशोत्सव अवघ्या ९ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांना कोकणाचे वेध लागले आहेत. १६ तारखेपासून मुंबईकर मोठ्या संख्येनी कोकणाकडे जायला निघणार आहेत. गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक पुणे आणि खोपोली मार्गे वळवली जाणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक ५ किमी अंतरावर पोलीस मोटार सायकलवरून गस्त घालणार आहेत. यासाठी ४० मोटरसायकल पथके तैनात केली जाणार आहेत. ज्यात ३० अधिकारी आणि १३० कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. ते २४ तास दोन टप्प्यांत महामार्गावर तौनात राहणार आहेत.
याशिवाय यासाठी ७५ वाहतूक पोलीस अंमलदार, २७५ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार असे एकूण ३५० पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला १०० वार्डन व गृहरक्षक दलाचे १०० जवान असणार आहेत.
दहा ठिकाणी प्रवासी सुविधा केंद्र
रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगांव, लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी, पोलदापूर येथे महाराष्ट्र शासनामार्फत सुविधाकेद्र उभारण्यात येणार आहेत. या सुविधा केंद्रांवर गणेशभक्तांसाठी चहापान, वैद्यकीय सेवा, फोटो गॅलरी, पोलीस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहन दुरूस्ती या सुविधा उपलब्ध असतील. या ठिकाणी चहापान, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस तसेच वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत.
कुठे असतील सीसीटीव्ही कॅमेरे?
महामार्गवर हमरापूर फाटा, पेण-खोपोली बायपास, रामवाडी चौकी, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅन्ड, महाड तालुक्यात महाड शहर, नातेखिंड, विसावा हॉटेल, पाली जोड रस्ता या ठिकाणी एकूण १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमन करण्यास मदत होणार आहे.
कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग कोणते?
पर्याय क्रमांक १ – मुंबई गोवा महामार्ग (मुंबई, नवीमुंबई, पनवेल, महाड, मार्गे)
पर्याय क्रमांक २ – मुंबई, वाशी, पामबीच रोड, उरणफाटा, खारपाडा, वडखळ, महाड मार्गे
पर्याय क्रमांक ३ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (मुंबई, खालापूर टोल नाका, पेण, महाड मार्गे)
पर्याय क्रमांक ४ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (मुंबई, खालापूर, पाली फाटा, वाकण, महाड मार्गे)
पर्याय क्रमांक ५ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (सातारा, उंब्रज, पाटण, चिपळूण मार्गे)
पर्याय क्रमांक ६ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (सातारा, काराड, कोल्हापूर, मलकापूर, आंबा घाट मार्गे रत्नागिरी)
पर्याय क्रमांक ७ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (सातारा, कराड, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे कणकवली)
पर्याय क्रमांक ८ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (सातारा, कराड, कोल्हापूर, आंबोली मार्गे सावंतवाडी)
पर्याय क्रमांक ९ – मुंबई पुणे दृतगती मार्गे (सातारा, कराड, कोल्हापूर, राधानगरी मार्गे कणकवली)
कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत अथवा अडचणीमध्ये मदतीकरीता तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा, गणेशभक्तांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल. वाहनचालकांनी कोकणात जाताना लेनची शिस्त पाळावी. जेणेकरून वाहतुकीचे नियमन करणे सोपे जाईल. या कालावधीत महामार्गावर अवजड वाहतूक बंद रहील याची खबरदारी घेतली जात आहे. – सोमनाथ घार्गे , पोलीस अधीक्षक रायगड