घरात, सोसायटय़ांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा होत असताना आता कैदीसुद्धा मागे नाहीत. येरवडा कारागृहातील चार बराकींमध्ये कैद्यांनी कैद्यांनी स्वत: वर्गणी गोळा करून दहा दिवसांसाठी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे, त्याची आकर्षक आरासही केली आहे.
विविध गुन्ह्य़ांची शिक्षा भोगत असलेल्या येरवडा कारागृहातील कैद्यांना महिन्याला दीड हजार रुपये खर्च करण्यास परवानगी असते. हे पैसे कैद्याच्या कारागृहातील खात्यावर जमा असतात. या पैशातून चारही बराकीतील कैदी वर्गणी गोळा करतात. त्यातून जमा होणाऱ्या पैशातून कारागृह प्रशासन साधारण तीनशे ते चारशे रुपये किमतीची गणपतीच्या मूर्ती बाहेरून आणून देते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी बराकीची स्वच्छता केली जाते. कारागृहात असणाऱ्या शिवणकाम, सुतारकाम, रंगकाम या  विभागातील कागदाचे पुठ्ठे, लाकडाचा भुसा, रंग आदी साहित्याच्या माध्यमातून गणपतीची आरास केली जाते. त्यासाठी कारागृहाच्या बागेतील फुलांचा उपयोग केला जातो. या वर्षी प्रत्येक ठिकाणी वेगळी सजावट केलेली आहे.
याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की वर्गणीच्या पैशातून प्रसाद म्हणून कारागृहाच्या कॅन्टीनमधून फळे, अगरबत्ती खरेदी केली जाते. कैद्यांना लोखंड, काच, पत्रा, कात्री अशा वस्तू दिल्या जात नाहीत. गणपतीसमोर कार्यक्रम करण्यास कैद्यांना बंदी आहे. मात्र, काही ज्येष्ठ कैदी गणपतीसमोर भजन, कीर्तन करतात. त्यासाठी कारागृह प्रशासनाकडून टाळ, पेटी, मृदंग दिले जाते. दहा दिवस सर्व कैदी रात्री व सकाळी एकत्र जमून आरती करतात. या गणेशोत्सवात सर्व धर्मीयांचा सहभाग असतो. अनंत चतुर्दशीला या यार्डामध्येच कैदी विशिष्ट वेळेत विसर्जन मिरवणूक काढतात. त्या ठिकाणी जाऊन कारागृहाचे कर्मचारी गणपती घेऊन त्याचे नंतर विसर्जन करतात. दहा दिवस कारागृहातील वातावरण भक्तिमय असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा