वरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे. आमटेंचे कार्य व ज्ञानदा यांच्यात तुलना होऊच शकत नाही, पण शिक्षणक्षेत्रात चमकू पाहणाऱ्या, पण परिस्थितीमुळे ते शक्य नसलेल्या अनाथ हिऱ्यांना कोंदण घालण्याचे काम गेल्या ४३ वर्षांपासून ‘ज्ञानदा’त अव्याहतपणे सुरू आहे.
१९७१ ची गोष्ट. थोर समाजसेवक बाबा आमटेंच्या महारोगी सेवा समितीतर्फे संचालित आनंदनिकेतन महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले मधुकरउपलेंचवार सर तास घेऊन शिक्षक कक्षात बसलेले असताना एक विद्यार्थी त्यांच्याकडे आला. घरची परिस्थिती हलाखीची आहे. शिक्षणासाठी तर सोडाच, पण दोन वेळच्या अन्नासाठीसुद्धा पैसे नाहीत. तेव्हा आता शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला माफ करा हे विद्यार्थ्यांच्या तोंडचे वाक्य ऐकून उपलेंचवार सर अस्वस्थ झाले. तेव्हा त्यांचा पगार होता २२० रुपये. क्षणभर विचार केल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांला स्वत:च्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असलेल्या या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली. विद्यार्थ्यांने होकार दिला. तो सरांच्या घरी राहायला आला आणि त्याच दिवशी ज्ञानदा वसतिगृहाची कल्पना प्रत्यक्षात साकार झाली. तो विद्यार्थी होता राज्याचे माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे! वरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे. आमटेंचे कार्य व ज्ञानदा यांच्यात तुलना होऊच शकत नाही, पण शिक्षणक्षेत्रात चमकू पाहणाऱ्या, पण परिस्थितीमुळे ते शक्य नसलेल्या अनाथ हिऱ्यांना कोंदण घालण्याचे काम गेल्या ४३ वर्षांपासून ‘ज्ञानदा’त अव्याहतपणे सुरू आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून उपलेंचवार सरांनी सुरू केलेल्या ‘ज्ञानदा’ या लहानशा रोपटय़ाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९७१ ला केवळ १५ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे वसतिगृह सुरू झाले. दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळतो.
तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा
सरांनी आरंभापासून विद्यार्थी निवडीचे सूत्र निश्चित केले आहे. ही निवड करताना जात पात, धर्म काहीही बघायचे नाही. विद्यार्थी गरीब असला पाहिजे. त्याच्यात शिकण्याची जिद्द असायला हवी. तो होतकरू असावा, अशी सरांची अपेक्षा असते. या वसतिगृहात विद्यार्थ्यांला मोफत प्रवेश दिला जात नाही. त्याची आर्थिक कुवत लक्षात घेऊन नाममात्र शुल्क आकारले जाते. आधी हे शुल्क फारच कमी होते. आता महिन्याला ६०० ते १ हजार रुपये घेतले जातात. विद्यार्थी हुशार आहे, पण पैसे भरण्याची ऐपत नाही, हे लक्षात आले तर त्याचे शुल्क संस्थेकडून भरले जाते. आईवडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. चांगला व संस्कारक्षम विद्यार्थी घडावा म्हणून उपलेंचवार सरांनी एक सूत्र निश्चित केले आहे. ‘तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा’ या शीर्षकाखाली चालणारा हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांला पूर्ण करावाच लागतो. यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेत अनेक थोरामोठय़ांची वचने व विचार देण्यात आले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाच्या सौंदर्याचा अर्थ विद्यार्थ्यांना कळावा, विद्य़ार्थी परीक्षार्थी नाहीत, तर ज्ञानार्थी व्हावेत, घर, समाज, राष्ट्राविषयी आत्मीयता त्यांच्यात वाढीला लागावी, अभ्यास करण्याची क्षमता वाढावी, विद्यार्थ्यांचे मन शुद्ध होईल, असे आचरण अमलात यावे, यासाठी या पुस्तिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. विद्यार्थी निवडताना एखादा चुकीचा किंवा वाईट विचाराचा विद्यार्थी ‘ज्ञानदा’त आला तरी या उपक्रमाच्या माध्यमातून तो लक्षात येतो. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. तरीही फरक पडला नाही, तर मग तो विद्यार्थीच सोडून जातो.
जगभर विद्यार्थी
आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या ज्ञानदाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. ज्ञानदाकडून हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. सध्याच्या घडीला १० लाख रुपये मदतीच्या स्वरूपात दिले जातात. गेल्या ४३ वर्षांत एक हजार विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ज्ञानदाने आजवर ४०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. या वसतिगृहातून शिकलेले विद्यार्थी व्यवस्थापन शाखेत नावाजलेले आहेत. ५० पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर आहेत, अभियंते आहेत. शिक्षक व प्राध्यापक आहेत. जगातल्या नऊ देशात ‘ज्ञानदा’चे विद्यार्थी विखुरलेले आहेत.
शासकीय अनुदानाविना
कोणतेही शासकीय अनुदान न घेता विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्थेचा खर्च करणाऱ्या, तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या ‘ज्ञानदा’ची वार्षिक उलाढाल आता १ कोटी २० लाखावर गेली आहे. या संस्थेला निवास, भोजन व शिक्षण शुल्कासाठी वर्षांला ३५ लाख रुपये लागतात. त्यातले १० लाख रुपये संस्थेचे माजी विद्यार्थी देतात. वरोरा व आजूबाजूच्या परिसरातील अनेक देणगीदार १० लाख रुपये देतात. कुणी वाढदिवसाच्या निमित्ताने एक अथवा दोन जेवणाची जबाबदारी उचलतो, तर कुणी आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देणगी देतात. मुंबईत ‘केअरिंग फ्रेंडस’ नावाचा देणगीदारांचा एक गट आहे. या गटाकडून दरवर्षी १७ लाखरुपयांची देणगी मिळते. याशिवाय, देशविदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय दरवर्षी किमान ३५ लाखाची देणगी देतात. यातून नवीन बांधकाम, नव्या सोयी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते.
संगणक प्रशिक्षण केंद्र
उपलेंचवार सर आता प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन १९ वर्षे लोटली आहेत. गेल्या ४३ वर्षांपासून त्यांनी स्वत:चे जीवन या वसतिगृहासाठी वाहून घेतले आहे. रोज सकाळी १० वाजता संस्थेत येणारे सर रात्री ९ वाजता घरी जातात. ते दोन्ही वेळचे जेवण विद्यार्थ्यांसोबत घेतात. केवळ तेच नाही, तर त्यांच्या पत्नी वीणा यांनीही संस्थेची जबाबदारी उचलली आहे. या संस्थेत एकूण १५ कर्मचारी मानधन तत्त्वावर काम करतात. मानधन जास्त देऊ शकत नाही, याची जाणीव असल्याने या १५ कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. स्वत: उपलेंचवार सरांनी आपली सारी मिळकत या संस्थेला देऊन टाकली आहे. या संस्थेत आता विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात केवळ वसतिगृहातील विद्यार्थीच नाही, तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना, महिलांना, मुलींना सुद्धा नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात चांगले नाव असलेल्या जळगावच्या दीपशिखा संस्थेतर्फे सर्व अभ्यासक्रम या केंद्राला कोणतेही शुल्क न घेता पुरवला जातो. या केंद्रातही बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या केंद्रात व वसतिगृहात आनंदनिकेतन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी येतात व शिकवणी घेतात. ‘ज्ञानदा’त प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांने बाहेरचा शिकवणी वर्ग लावण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.
दरवर्षी स्नेहमेळावा
संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील एका समाजसेवकाला ‘ध्येयवादी कार्यकर्ता’ पुरस्कार दिला जातो. ५१ हजाराच्या या पुरस्काराची रक्कम भद्रावतीचे श्रीधरराव पद्मावार देतात. या पुरस्काराच्या निमित्ताने होणारा सोहळा म्हणजे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमीलन असते. देशविदेशात नोकरी करणारे झाडून सारे विद्यार्थी या सोहळ्याला एकत्र येतात. दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या या स्नेहमीलनाच्या वेळी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला जातो व विस्ताराचा कार्यक्रम निश्चित केला जातो. आता ‘ज्ञानदा’ संचालित करणाऱ्या संस्थेत उपलेंचवार सरांनी अनेक माजी विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. तुम्ही शिकले, मोठे झाले. आता संस्था तुम्हीच मोठी करा. मी एक निमित्तमात्र आहे, अशी भावना उपलेंचवार सर बोलून दाखवतात. म्हणूनच वरोराच्या या ‘ज्ञानदा’कडे सकारात्मक ऊर्जा देणारे केंद्र म्हणून शिक्षण क्षेत्रात बघितले जाते.
संस्थेपर्यंत कसे जाल?
मध्य रेल्वेवर नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशात कोणत्याही ठिकाणावरून येथे येता येते. नागपूरला उतरल्यानंतर वरोरा १०० कि.मी. अंतरावर असून ज्ञानदा वसतिगृह आनंदवन प्रकल्पाच्या अगदी समोर आहे.
वसतिगृहात आणखी विद्यार्थी यावेत, अशी इच्छा मधुकर उपलेंचवार सर बोलून दाखवतात. त्यासाठी देणगीची गरज आहे. ज्ञानदाकडे विद्यार्थ्यांचा ओघ दरवर्षी वाढत आहे, पण आर्थिक क्षमता बघूनच काम करावे लागते. नुसता विद्यार्थी घडवणे हे या वसतिगृहाचे उद्दिष्ट नाही, तर संस्कारक्षम माणूस घडवणे हेच ज्ञानदाचे आजवरचे वैशिष्टय़ राहिले आहे. हाच लौकिक संस्थेला कायम ठेवायचा आहे.
सर थकले आहेत, हे लक्षात आल्यानंतर ‘ज्ञानदा’चा वसा पुढे कुणी चालवायचा, असा प्रश्न
उपस्थित झाला. अखेर संस्था संचालित करण्यासाठी गजानन लोणबळे या माजी विद्यार्थ्यांची निवड केली. संस्थेमुळे शिकू शकलेले लोणबळे गडचिरोली जिल्ह्य़ातील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे.
सर आणि माजी विद्यार्थ्यांमधला हा स्नेहबंध येथेच थांबत नाही. संस्थेतून शिकून मोठा झालेला प्रत्येक विद्यार्थी लग्न ठरवताना सरांना विचारतो. हुंडा घेतला नाही, हे भावी सासऱ्याकडून सरांना सांगायला लावतो. आपल्या होणाऱ्या पत्नीला स्वत:ची पाश्र्वभूमी सांगतो व लग्न होताच दैवत असलेल्या सर व वहिनींच्या चरणी नतमस्तक होतो. हाच खरा स्नेहबंध आहे.
संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थी वर्षांला केवळ १० लाखाची देणगी देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी हिंगणघाटला याच पद्धतीचे एक वसतिगृह सुरू केले आहे. तेथे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते. संस्थेचे माजी विद्यार्थी व विदर्भातील प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर, प्रा. दादा बनकर यांनीही नागपुरात एक नवीन संस्था तयार करून बुटीबोरीजवळ कृतज्ञता वसतिगृह सुरू केले आहे.
धनादेश या नावाने काढावेत
विद्यार्थी सहायक समिती, वरोरा
Vidyarthi Sahayak Samiti, Varora
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट क्र. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९,
०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३
नगर कार्यालय
संपादकीय विभाग, आशीष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली-११०००२. ०११-२३७०२१००