१९७१ ची गोष्ट. थोर समाजसेवक बाबा आमटेंच्या महारोगी सेवा समितीतर्फे संचालित आनंदनिकेतन महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले मधुकरउपलेंचवार सर तास घेऊन शिक्षक कक्षात बसलेले असताना एक विद्यार्थी त्यांच्याकडे आला. घरची परिस्थिती हलाखीची आहे. शिक्षणासाठी तर सोडाच, पण दोन वेळच्या अन्नासाठीसुद्धा पैसे नाहीत. तेव्हा आता शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला माफ करा हे विद्यार्थ्यांच्या तोंडचे वाक्य ऐकून उपलेंचवार सर अस्वस्थ झाले. तेव्हा त्यांचा पगार होता २२० रुपये. क्षणभर विचार केल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांला स्वत:च्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असलेल्या या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली. विद्यार्थ्यांने होकार दिला. तो सरांच्या घरी राहायला आला आणि त्याच दिवशी ज्ञानदा वसतिगृहाची कल्पना प्रत्यक्षात साकार झाली. तो विद्यार्थी होता राज्याचे माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे! वरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे. आमटेंचे कार्य व ज्ञानदा यांच्यात तुलना होऊच शकत नाही, पण शिक्षणक्षेत्रात चमकू पाहणाऱ्या, पण परिस्थितीमुळे ते शक्य नसलेल्या अनाथ हिऱ्यांना कोंदण घालण्याचे काम गेल्या ४३ वर्षांपासून ‘ज्ञानदा’त अव्याहतपणे सुरू आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून उपलेंचवार सरांनी सुरू केलेल्या ‘ज्ञानदा’ या लहानशा रोपटय़ाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९७१ ला केवळ १५ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे वसतिगृह सुरू झाले. दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळतो.
तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा
सरांनी आरंभापासून विद्यार्थी निवडीचे सूत्र निश्चित केले आहे. ही निवड करताना जात पात, धर्म काहीही बघायचे नाही. विद्यार्थी गरीब असला पाहिजे. त्याच्यात शिकण्याची जिद्द असायला हवी. तो होतकरू असावा, अशी सरांची अपेक्षा असते. या वसतिगृहात विद्यार्थ्यांला मोफत प्रवेश दिला जात नाही. त्याची आर्थिक कुवत लक्षात घेऊन नाममात्र शुल्क आकारले जाते. आधी हे शुल्क फारच कमी होते. आता महिन्याला ६०० ते १ हजार रुपये घेतले जातात. विद्यार्थी हुशार आहे, पण पैसे भरण्याची ऐपत नाही, हे लक्षात आले तर त्याचे शुल्क संस्थेकडून भरले जाते. आईवडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. चांगला व संस्कारक्षम विद्यार्थी घडावा म्हणून उपलेंचवार सरांनी एक सूत्र निश्चित केले आहे. ‘तुम्हीच तुमचे शिल्पकार व्हा’ या शीर्षकाखाली चालणारा हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांला पूर्ण करावाच लागतो. यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेत अनेक थोरामोठय़ांची वचने व विचार देण्यात आले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाच्या सौंदर्याचा अर्थ विद्यार्थ्यांना कळावा, विद्य़ार्थी परीक्षार्थी नाहीत, तर ज्ञानार्थी व्हावेत, घर, समाज, राष्ट्राविषयी आत्मीयता त्यांच्यात वाढीला लागावी, अभ्यास करण्याची क्षमता वाढावी, विद्यार्थ्यांचे मन शुद्ध होईल, असे आचरण अमलात यावे, यासाठी या पुस्तिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. विद्यार्थी निवडताना एखादा चुकीचा किंवा वाईट विचाराचा विद्यार्थी ‘ज्ञानदा’त आला तरी या उपक्रमाच्या माध्यमातून तो लक्षात येतो. त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. तरीही फरक पडला नाही, तर मग तो विद्यार्थीच सोडून जातो.
जगभर विद्यार्थी
आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या ज्ञानदाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. ज्ञानदाकडून हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. सध्याच्या घडीला १० लाख रुपये मदतीच्या स्वरूपात दिले जातात. गेल्या ४३ वर्षांत एक हजार विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ज्ञानदाने आजवर ४०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. या वसतिगृहातून शिकलेले विद्यार्थी व्यवस्थापन शाखेत नावाजलेले आहेत. ५० पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर आहेत, अभियंते आहेत. शिक्षक व प्राध्यापक आहेत. जगातल्या नऊ देशात ‘ज्ञानदा’चे विद्यार्थी विखुरलेले आहेत.
शासकीय अनुदानाविना
कोणतेही शासकीय अनुदान न घेता विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्थेचा खर्च करणाऱ्या, तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या ‘ज्ञानदा’ची वार्षिक उलाढाल आता १ कोटी २० लाखावर गेली आहे. या संस्थेला निवास, भोजन व शिक्षण शुल्कासाठी वर्षांला ३५ लाख रुपये लागतात. त्यातले १० लाख रुपये संस्थेचे माजी विद्यार्थी देतात. वरोरा व आजूबाजूच्या परिसरातील अनेक देणगीदार १० लाख रुपये देतात. कुणी वाढदिवसाच्या निमित्ताने एक अथवा दोन जेवणाची जबाबदारी उचलतो, तर कुणी आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देणगी देतात. मुंबईत ‘केअरिंग फ्रेंडस’ नावाचा देणगीदारांचा एक गट आहे. या गटाकडून दरवर्षी १७ लाखरुपयांची देणगी मिळते. याशिवाय, देशविदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय दरवर्षी किमान ३५ लाखाची देणगी देतात. यातून नवीन बांधकाम, नव्या सोयी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा