नाशिक : शहरातील गणेश विसर्जन मिरवणुूकीला दरवर्षी संथपणामुळे उशीर होत असल्याने यंदा मिरवणूक वेळेत सुरु करुन वेळेत संपवावी, अशा सूचना सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांसमोर बैठकीत मांडल्या. मंडळांनी मागील मिरवणुकीच्यावेळी आलेल्या अडचणींविषयी चर्चा करुन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी होणाऱ्या नियोजनाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी येत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत नियोजनास सुरूवात केली आहे. शनिवारी शहर परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांची भद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. बैठकीत मंडळांनी आपल्या अडचणी मांडल्या. मिरवणुकीत शिस्तबध्दता असावी, दिलेल्या क्रमांकानुसारच मंडळांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, मिरवणूक न थांबता पुढे जात राहील याची काळजी घ्यावी, आदी सूचना करण्यात आल्या. भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सार्वजनिक मंडळांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी मांडल्याचे सांगितले. ईदच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने ही बैठक झाली. मंडळाने मांडलेल्या अडचणींवर सोमवारी बैठक होणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीत केवळ एका मंडळासाठी एकच ढोल पथक ठेवता येणार आहे. मिरवणूक शिस्तबध्द होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- किरणकुमार चव्हाण (पोलीस उपायुक्त)