Pune Ganesh Utsav 2023: आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे आता काही दिवसांवर आलं आहे, आणि प्रत्येक घराघरात त्याच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. घरांप्रमाणेच प्रत्येक मंडळ देखील यावर्षी नवीन काय करायचं, मंडपाची सजावट कशी करायची, कार्यक्रम कोणते ठेवायचे याची तयारी करत आहेत. आता गणेशोत्सव केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील युके, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड यांसारख्या देशात साजरा केला जातो. तरीही विशेष आकर्षण हे मात्र मुंबई-पुण्यातल्या देखाव्यांचंच असतं असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा हे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे, पुण्यातल्या कसबा पेठ गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग व केसरीवाडा या मानाच्या गणपतींसह दगडूशेठ गणपतीला भेट देण्यासाठीसुद्धा लोकं प्रचंड गर्दी करतात. पुण्यातील गणेशोत्सवाबाबत अजून एक खास आकर्षण म्हणजे सजीव किंवा जिवंत देखावे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता हे सजीव किंवा जिवंत देखावे म्हणजे काय? तर ४ ते ६ कलाकार साधारण १० मिनिटांचं एक नाट्य सादर करतात. त्या नाटकाचे गणेशोत्सवादरम्यान रोज संध्याकाळ ते रात्रीपर्यंत ८ ते ९ प्रयोग होतात. या देखाव्यायाची सुरवात खरंतर महिनाभर आधीच होते. त्यामध्ये स्क्रिप्ट लिहिणं, त्याचं व्हॉइस रेकोर्डिंग करणं, कलाकारांसोबत ते नाटक बसवणं, सेट उभारणं, लाईट्स व म्युझिक या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी असते.

या जिवंत देखाव्याची सुरवात ही साधारण १९९५ नंतर दादा पासलकर, त्यांचे सहकारी, वृंदा साठे व इतर कलाकारांनी केली. नाटकप्रेमी व हौशी कलाकारांना यातून वाव मिळावा, हा साधा हेतू होता. २००४ पासून कसबा पेठेतील साईनाथ गणपती मंडळाने जिवंत देखावा सादर करण्यास सुरवात केली, व त्यानंतर आता प्रत्येक छोट्या-मोठ्या मंडळांनी देखील या देखाव्यांना भरपूर पसंती दिली आहे.

हे ही वाचा<< १ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा

या देखाव्यांमध्ये ऐतिहासिक घटना, सर्वसामान्यांचे प्रश्न, राजकीय विषयांसोबतच, सामाजिक विषयही अगदी सहजतेने मांडले जातात. १० ते १२ मिनिटांच्या या नाटकांतून जमलेल्या प्रेक्षकांसमोर गंभीर विषयसुद्धा हसत-खेळत सादर केले जातात. या जिवंत देखाव्यांमध्ये नाटकाची आवड असणाऱ्या शाळकरी मुलांपासून ते अगदी ४०-५० वर्षांची हौशी मंडळीसुद्धा आनंदाने सहभागी होतात. केवळ १० दिवस याचे प्रयोग असले तरीही त्या दहा दिवसांसाठी त्यांना एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे वागणूक मिळते. त्यामुळे यावर्षी मानाच्या गणपतींसोबत या खास देखाव्यांना, जिवंत देखाव्यांना भेट द्यायला अजिबात विसरू नका.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune kasba peth ganpati mandal make live decoration with human artist know amazing history of manache ganpati svs