Modi Ganpati History : पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुणे शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. दर दिवशी हजारोंच्या संख्येने लोक पुणे दर्शनासाठी येत असतात. पुण्यात येणारा प्रत्येक पर्यटक येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आवर्जून दर्शन घेतो; पण तुम्हाला माहीत आहे का की, पुण्यात एक ‘मोदी गणपती’चे मंदिर आहे. या ‘मोदी गणपती’चा इतिहास काय? या गणपतीला ‘मोदी’ नाव कसं पडलं? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
या गणपतीला ‘मोदी गणपती’ नाव कसे पडले?
सुमारे २०० वर्षं हे जुनं मोदी गणपतीचं मंदिर पत्र्या मारुती चौकातून नदीपात्राकडे जाताना रस्त्याच्या मध्ये लागतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची विशेष ख्याती आहे.
नारायण पेठेमध्ये एका मोदी नावाच्या शेठजींची मोठी बाग होती आणि या बागेमध्ये एकदा एक बाप्पांची सुंदर
मूर्ती सापडली. मोदींच्या बागेमध्ये ही मूर्ती सापडल्यामुळे या गणपतीला ‘मोदी गणपती’ असं नाव पडलं.
हेही वाचा : यंदा अष्टविनायक यात्रेचा विचार करीत आहात? जाणून घ्या, या स्वयंभू गणपतींविषयी माहिती …
कोण आहेत मोदी शेठजी?
दुसऱ्या बाजीरावांच्या काळात मोदी नावाचे शेठजी हे इंग्रजी रेसिडेन्सीमध्ये चाकरी करायचे. त्यावेळी त्यांना फारसी भाषेसह इतर अनेक भाषा अवगत होत्या. त्यामुळे जेव्हा शनिवारवाडा आणि इंग्रजी रेसिडेन्सीमध्ये संपर्क व्हायचा त्यावेळी हे शेठजी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडायचे.
मंदिराची मालकी
या मोदी गणपतीची सेवा त्या काळापासून रत्नागिरीतील भट कुटूंब आजतागायत करीत आहे. आजही हे मंदिर भट कुटुंबाच्या खासगी मालकीचं आहे.
हेही वाचा : यंदा अष्टविनायक यात्रेचा विचार करीत आहात? जाणून घ्या, या स्वयंभू गणपतींविषयी माहिती …
मंदिराचं बांधकाम
१८६८ च्या काळात या सभामंडप, गाभारा, प्रांगण आणि त्याभोवती भिंत बांधून या मंदिराला देखणं असं स्वरूप देण्यात आलं. मंदिरात प्रवेश केला की, डाव्या बाजूला मारुतीचं छोटेखानी मंदिर आहे. लाकडी खांब असलेला सभामंडप तर सर्वांचं लक्ष वेधून घेतो. विटांनी बांधलेला मंदिराचा कळस आणि त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पितळी मखरामध्ये एक मीटर उंचीची चतुर्भुज उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मोदी गणपतीच्या दर्शनासाठी पुणे आणि पुण्याच्या बाहेरूनही अनेक लोक येतात.