नाना पेठेतील एका मंडळाने पर्यावरणावर आधारित देखावा सादर केला असून, गणपतीच्या प्रसादासोबत वृक्षांच्या बिया आणि वृक्ष कायद्याची पुस्तिका असा पर्यावरणीय प्रसादही वाटला जात आहे. याबरोबरच विसर्जन मिरवणुकीतही अशा पुस्तिका वाटण्याचा संकल्प मंडळातर्फे करण्यात आला आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील चाचा हलवाई दुकानाजवळ असलेल्या शिवशक्ती तरुण मंडळाने हा देखावा उभा केला आहे. त्यात वृक्षतोड, डोंगरफोड, ध्निप्रदूषण, वायूप्रदूषण या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध उद्योग व कारखानेसुद्धा कसे नद्या व समुद्राला प्रदूषित करतात, याबाबत देखावा सादर करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. भाविकांना आणि मंडळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना प्रसादाबरोबर ५० बिया असलेले पाकीट देण्यात येत आहे. त्यात दहा वृक्षांच्या प्रत्येकी पाच बियांचा समावेश आहे. याचबरोबर निवडक भाविकांना नागरी वृक्ष संवर्धन कायद्याची प्रतही देण्यात येत आहे. नागरिकांमध्ये पर्यावरणाचा संदेश पोहोचविण्यासाठी हे वाटप करण्यात येत आहे, असे या मंडळाचे सचिव प्रमोद राऊत आणि कार्यकर्ते कल्पेश मेहता यांनी सांगितले.
‘‘बिया वाटपाचे काम केवळ गणपतीपुरतेच मर्यादित नाही, तर हे काम पुढेही सुरू ठेवणार आहोत. विशेषत: पंढरीच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांना अशा बिया देऊन त्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यास सांगण्यात येणार आहे. मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा काही अंतर चालून बिया रुजविण्याचे काम करतील. या वेळच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वृक्ष संवर्धन कायद्याच्या पुस्तिका वाटण्यात येणार आहेत.’’
कल्पेश मेहता, शिवशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा