Famous Manache Ganpati Mandal in Pune: गणरायाच्या आगमनास आता काही दिवसच उरले आहेत. सर्व भक्तांना कधी एकदा गणेशोत्सव सुरू होतोय, अशी आतुरता लागून राहिली आहे. दरवर्षी महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक गणोशोत्सव उत्साहात साजरा केला जातो; विशेषत: पुण्यात. कारण- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती, बाबूगेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि बाहेरगावाहूनही भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले असले तरी पुण्यातील मानाच्या गणपतींचे महत्त्व आजही कायम आहे. चला तर मग पुण्यातील मानाच्या या पाच गणपतींविषयी जाणून घेऊ…

मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे. विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. आठवड्यातून दोन वेळा या मूर्तीला शेंदूरलेपन केले जाते. या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. १६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. १८९३ साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

हेही वाचा – गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..

  • ठिकाण : कसबा पेठ, पुणे.
  • जवळचे ठिकाण : शनिवार वाडा
  • कसे पोहोचाल? : पुणे महापालिका बस थांब्यापासून बसने येऊ शकता. मनपा बस थांब्यावरून येत असाल, तर जयवंतराव टिळक पूल किंवा मनपा पुलावरून (शिवाजी पूल) शनिवारवाड्याच्या दिशेने पायी चालत जावे लागेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून तुम्ही पाच मिनिटांमध्ये श्री कसबा गणपतीच्या महाद्वाराजवळ पोहोचाल. वेशीतून आत गेल्यावर तुम्हाला कसबा गणपतीचे मंदिर दिसेल.
  • तुम्ही डेक्कन जिमखान्याच्या बस थांब्यावरून येत असला, तर त्यामागे असलेला भिडे पूल ओलांडून नदीपात्राच्या रस्त्याने जयवंतराव टिळक पुलापर्यंत रिक्षाने किंवा वाहनाने येऊ शकता. तेथून वर सांगितल्याप्रमाणे, पायी रस्त्याने कसबा मंदिरापर्यंत पोहोचू शकता. येथून जवळच असलेल्या दगडूशेठ गणपतीचेदेखील तुम्ही दर्शन घेऊ शकता.

मानाचा दुसरा गणपती – तांबडी जोगेश्वरी गणपती

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. भाऊ बेंद्रे यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. आधी गणपतीची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जात असे; पण २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पुण्यातील मानाच्या गणपतींचे आणि इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. पण, तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि दरवर्षी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

हेही वाचा -Ganesh Visarjan 2024: दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

  • ठिकाण : बुधवार पेठ, पुणे
  • जवळचे ठिकाण: शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती मंदिर
  • कसे पोहोचाल? : कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने पायी चालायला सुरुवात करा. पाच मिनिटे चालल्यानंतर जिजामाता चौक ओलांडून हुतात्मा चौकात या. तेथून आप्पा बळवंत चौकाच्या दिशेने जा. एक मिनिटात तुम्ही तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिराच्या ठिकाणी पोहोचाल. येथून जवळच असलेल्या भाऊ रंगारी गणपतीचेही तुम्ही दर्शन घेऊ शकता.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती. सुरुवातीला हा गणपती तालीममध्ये बसवला जायचा; पण आता ही तालीम अस्तित्वात नाही. आता मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवाला विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे १८८७ सालीच या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या उत्सवाचा पाया रचला तो भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

  • ठिकाण : लक्ष्मी रस्ता, बुधवार पेठ
  • जवळचे ठिकाण : तुळशीबाग.
  • कसे पोहोचाल? : तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने तुळशीबागेच्या दिशेने चालत जा. एक मिनिटामध्ये तुम्ही लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात पोहोचाल. तेथून उजव्या दिशेला गेल्यास तुम्हाला लगेच गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेता येईल.

मानाचा चौथा गणपती -तुळशीबाग गणपती

पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती. हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. महिलांचे आवडते खरेदीचे ठिकाण म्हणजे तुळशीबागेच्या मध्यभागी याची प्रतिष्ठापना होते.

दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तिकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो. पुण्यातील हलत्या देखाव्यांची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली होती.

  • ठिकाण : तुळशीबाग
  • जवळचे ठिकाण : लक्ष्मी रस्ता
  • कसे पोहोचाल? : गुरुजी तालीम गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही पुन्हा लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकात पोहोचाल. तेथून तुळशीबागेत प्रवेश करा. तुम्हाला लगेच तुळशीबाग गणपतीचे दर्शन घेता येईल.

मानाचा पाचवा गणपती – केसरी वाडा गणपती

पुण्यातला शेवटचा व पाचवा मानाचा गणपती म्हणून जो ओळखला जातो, तो म्हणजे केसरी वाडा गणपती. १८९४ पासून केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला. त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूकदेखील पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते.

  • ठिकाण : केळकर रस्ता
  • जवळचे ठिकाण : आप्पा बळवंत चौक
  • कसे पोहोचाल? : तुळशीबाग गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गणपती चौकातून सरळ जाऊन तांबडी जोगेश्वरी मंदिरापर्यंत परत या. तेथून आप्पा बळवंत चौकापर्यंत पायी चालत या. त्यानंतर केळकर रस्त्यावर चालायला लागा. पाच मिनिटे चालल्यानंतर केसरी वाड्यापर्यंत पोहोचाल. येथे तुम्हाला केसरी वाड्याच्या गणपतीचे दर्शन घेता येईल.

दर्शन घेतल्यानंतर तुम्ही घरी परत जाण्यासाठी डेक्कन जिमखाना येथील बसथांब्यावर जाऊ शकता. मनपाला जाण्यासाठी तुम्हाला डेक्कन जिमखाना येथून फर्ग्युसन रस्त्यावर जावे लागेल. तेथून तुम्हाला मनपाकडे जाणाऱ्या बसेस मिळतील. पायी चालत जायचे असल्यास तुम्ही भिडे पूल येथील नदीपात्राच्या रस्त्याने जयवंतराव टिळक पुलापर्यंत जाऊ शकता. पूल ओलांडल्यानंतर तुम्ही मनपा बसथांबा येथे पोहोचाल.