नागपूर: नागपूरसह इतरत्र भाविक श्रद्धेने देवाला हार- फुल अर्पण करतात. या हार- फुलांचे निर्माल्य कचऱ्यात फेकले जाते.नागपूरातील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिराने भाविकांनी अर्पण केलेल्या हार फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधित धूप कांडी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे या धूप कांडीचा सुगंध घरात दरवळणार आहे.प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरातील उपक्रमानुसार आधी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या हार फुलांना सुकवले जाते. त्यात पंचगव्य मिसळले जाते. या सर्व मिश्रणाचे नंतर मशीनचा मदतीने धूप कांडी तयार केली जाते. सध्या रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे २५ किलो धुपकांडी तयार केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध पुढे धूपकांडीच्या स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार आहे, हे समजल्यानंतर भाविक देखील मोठ्या प्रमाणात मंदिरातून धूपकांड्या विकत घेऊ लागले आहेत. या उपक्रमामुळे मंदिराकडून अनेक महिलांना रोजगार मिळालाच आहे, शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. या विषयावर टेकडी गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव श्रीराम कुलकर्णी म्हणतात या उपक्रमामुळे भाविकांच्या श्रद्धेचा मान देखील राखला गेला आहे.