भारतामध्ये देवाला सर्वोच्च स्थान दिले जाते. लोकांच्या भावना आणि श्रद्धा देवाशी निगडित असतात. देवावर विश्वास असणारे लोक कठीणातील कठीण नवस बोलतात आणि ते पूर्णही करतात. काही लोकांचे नवस ऐकल्यावर आपल्यालाही धक्का बसतो. अशाच एका भक्ताने मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’कडे नवस केला होता. त्याचा नवस काय होता हे जाणून घेऊया.
या भक्ताचं नाव आहे समीर जगदीश दत्तानी. ४४ वर्षीय समीर गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी ७७० किलोमीटरचे अंतर २५ दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. समीर काल ७ सप्टेंबरला मुंबईमध्ये पोहचले. त्यांनी १३ ऑगस्टला आपला प्रवास सुरु केला होता. तब्बल २५ दिवसांचा पायी प्रवास करून ते काल मुंबईमध्ये पोहचले आहेत. दत्तानी गुजरात बोर्ड मध्ये शिक्षण निरीक्षक आहेत.
दत्तानी हे व्यवसायाने प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत. नुकतीच बढती मिळाल्यानंतर ते आता गुजरात शिक्षण मंडळात शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिड-डे वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ते लालबागचा राजाचे भक्त आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून ते सातत्याने मुंबईत येत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत ते कोरोनाच्या साथीमुळे मुंबईला जाऊ शकले नाहीत.
दत्तानी म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा मी लोकांना समस्यांशी झुंजताना पाहिले, तेव्हा लोक औषधे आणि ऑक्सिजनच्या शोधात होते. मी तेव्हाच हे व्रत घेतले आणि ठरवले की जर गणेशाने करोना महामारी संपवली आणि लोकांचे जीवन पूर्वीप्रमाणेच रुळावर येऊ लागले तर मी लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जाईन.’ आता परिस्थिती पूर्वपदावर आहे, त्यामुळेच ते आपला नवस पूर्ण करण्यासाठी गुजरातहून पायी निघाले.
रतन टाटा देवमाणूस! घरगुती गणपतीच्या लहानशा देखाव्यातून साकारली भव्य कलाकृती; पाहा Photos
दत्तानी म्हणाले, ते प्रवासादरम्यान दररोज ३० ते ३२ किमी चालायचे आणि रात्री विश्रांती घ्यायचे. १३ ऑगस्ट रोजी जुनागड येथून त्यांनी आपली यात्रा सुरू केली, ७४० किलोमीटरचा प्रवास करत ते काल मीरा रोडला पोहचले आणि संध्याकाळपर्यंत लालबागला पोहचले. त्यांनी सांगितले, २५ दिवस झाले तरी त्यांच्या समोर कोणतीही अडचण आली नाही. प्रवासादरम्यान लोकांनी त्यांना ठिकठिकाणी आदर दिला आणि प्रोत्साहन दिले, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली.